Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये काय म्हणाले? बीड आणि परभणीच्या घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं भाष्य.
नागपूर: राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. गेल्या दहा वर्षात तुम्ही पाहिले आहे, मी अशा आव्हानांचा सामना धैर्यपूर्वक करतो आणि सत्ता कधीही माझ्या डोक्यात जात नाही. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे असेच आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे पुढे ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते बुधवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'प्रेस द मीट' कार्यक्रमात बोलत होते.
मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. हा मंत्रीही नव्हता, नवखा आहे, मग कारभार कसा करणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं, सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की, आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊन दिला नाही. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले. पायाभूत क्षेत्रात आपण मोठी भरारी घेतली. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपण ऊर्जा विभागाचा 25 वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. पुढच्या दोन-तीन वर्षात अशी परिस्थिती येईल की, आपण उद्योगासहित सर्वप्रकारच्या वीजेचे दर कमी करु शकतो, अशी व्यवस्था आपण उभारली आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केली.
याशिवाय, आपण राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे विदर्भातील 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून उदयाला आले आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभी राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीसांनी मानले प्रसारमाध्यमांचे आभार
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातील प्रसारमाध्यमांचे आभार मानले. लोकसभेत महायुतील फेक नरेटिव्हचा मोठा फटका बसला होता. तो फेक नरेटिव्ह आम्ही प्रसारमाध्यमांमुळे ब्रेक करु शकलो. भाजपने महाराष्ट्रात 132 जागा जिंकून राजकीय जीवनातील उच्चांक गाठला. महायुतीलाही मोठा विजय मिळाला. मात्र, जनमताचा हा प्रचंड मोठा कौल मिळाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. या विजयासोबत आमच्यावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आले आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
शिवराजसिंह चव्हाण यांनी राज्यात 20 लाख पंतप्रधान आवास योजनेचे घर देण्याची जाहीर केले आहे. हे अभूतपूर्व आहे. पुढील पाच वर्षात आम्ही सर्वांना त्यांच्या हक्काचं घर देऊ. पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून घर देऊ आणि त्या घरांना सोलर वीज कनेक्शन देऊ.. म्हणजे त्या घरात राहायला जाणाऱ्यांना मोफत वीज मिळेल. आमचे आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी जी संधी मला दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेल. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे अशा पद्धतीने मी महाराष्ट्रात काम करेन. पारदर्शक पद्धतीने काम करेन, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट