Poonam Mahajan on LokSabha candidacy : भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचं तिकीट कापलंय. पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट करत भाजपकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने नवी खेळी केली आहे. पूनम महाजन यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवणे भाजपने टाळले आहे. दरम्यान, भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाल्या पूनम महाजन? 


पूनम महाजन (Poonam Mahajan) म्हणाल्या, खासदारकीच्या रुपाने मला गेल्या 10 वर्षात मुंबई उत्तर मध्य लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी मला दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देते. मला खासदार म्हणून नाही, तर मुलीप्रमाणे स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबियांची, जनतेची नेहमी ऋणी राहिल आणि आशा करते की, आपलं नातं कायम टिकून राहिलं. माझे दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला 'राष्ट्र प्रथम' हा मार्ग दाखवला, तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा,अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल, असं पूनम महाजन यांनी म्हटलंय. 


उज्ज्वल निकम यांना उमेदवारी 


पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना मतदारसंघात विरोध असल्याने भाजपने त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांत सरकारचे वकील असणाऱ्या उज्जल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उज्जल निकम यांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी असणार आहे. निकम यांच्या रुपाने भाजपने नवा चेहरा मैदानात उतरवला आहे. 


काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी 


मुंबईतील उत्तर-मध्य मुंबई ही जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाच्या वाट्याला येणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर ही जागा काँग्रेस पक्षाला सुटली. त्यानंतर काँग्रेसने धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाली. काँग्रेस नेते नसीम खान यांनी मी नाराज असल्याचे म्हटल होतं. मात्र, वर्षा गायकवाड यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे मित्र पक्षांनी वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. त्यांना खासदार करून दिल्लीला पाठवणार. देशात हुकूमशाही येता कामा नये, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या