Madha Loksabha : माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या रुपाने भाजपला हादरे बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच अकलूजमध्ये (Akluj) सलग तीन सभा घेणार आहेत. शिवाय, सभा घेण्यापूर्वीच फडणवीसांनी अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार पाडलंय. महायुतीच्या रविवारी (दि. 27) होणाऱ्या सभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातील डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil) हे उपस्थित राहणार आहेत.
अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार
देवेंद्र फडणवीस उद्या डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेणार आहेत. डॉ.धवलसिंह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, फडणवीसांच्या खेळीने अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधात दुसरे मोहिते पाटील भाजप बाजूने मैदानात उतरणार आहेत. डॉ. धवलसिंह हे माजी सहकार मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असून त्यांचा अकलूज परिसरात मोठा गट आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तन जानकर यांना मोठा धक्का आहे.
देवेंद्र फडणवीसांचा सभांचा धडाका
माढा लोकसभा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डाव प्रतिडावांमुळे प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनला आहे. त्यामुळेच शरद पवारांनी 3 सभा घेत प्रचाराचा धडाका लावलाय. तर आता शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सलग तीन सभांचा धडाका लावणार आहेत. उद्याच्या तीन सभांपैकी सर्वात महत्वाची सभा अकलूज येथे होणार असून मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय अकलूज येथील सभेला नेमके कोणकोण स्टेजवर असणार हे पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता वाढली आहे.
सांगोल्यातही देवेंद्र फडणवीसांची सभा
माढ्याची सभा संपवून फडणवीस हे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आयोजित केलेल्या सभेसाठी सांगोला येथे जाणार आहेत. या सभेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील आणि इतर महायुतीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सांगोला येथील सभा ही दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या तीन सभांना देवेंद्र फडणवीस हे तीन सभांतून उत्तर देणार असून यातील शेवटच्या म्हणजे अकलूजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी केलेल्या टीकेला फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या