सातारा: देशातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान हे पंतप्रधान मोदींना अस्वस्थ करणार आहे. कारण निवडणुकीचे पहिले दोन टप्पे संपल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपला स्वर बदलला आहे. त्यांनी मुस्लीम समाजाचा उघडपणे उल्लेख केला. त्यांना आता धर्मांध विचार घेऊनच मदत होऊ शकते, असे वाटत असावे. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात राहतील तसतसे त्यांचे स्थान हे संकटात जातंय, अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये असावी, असे माझे निरीक्षण असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. ते गुरुवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि एमआयएमला 1 अशा सहा जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. आता असं दिसतंय, आम्हा लोकांची संख्या 30 ते 35 वर जाईल. लोकांना बदल हवा आहे. लोकांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला समर्थन मिळत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी 17 मे रोजी मुंबईत होत असलेल्या राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबतही भाष्य केले. याबाबत त्यांनी म्हटले की, मोदी साहेबांना कोणाची ना कोणाची मदत हवी. त्यामधून मोदींचा आत्मविश्वास दिसून येतो, असे शरद पवार यांनी सांगितले.


मला कोणी त्रास देत नाही, शरद पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर


शरद पवार यांना सभा घ्यायला लावत आहात, त्यांना आराम द्या, तुम्ही प्रचार करा, असे अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना सुनावले होते. त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मला कोणी त्रास देत नाही. सगळेजण माझ्यासोबत प्रेमाने वागतात. आमची सगळ्यांची पडले ते कष्ट घेण्याची तयारी आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.



राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही: शरद पवार


आगामी काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी म्हटले की, मी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे म्हटले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अनेक वर्षे मंत्रिमंडळात एकत्र होते. आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. आताही अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना सहकार्य करत आहे. विचारधारा एक असल्यावर एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे, हे दोघांना स्पष्ट व्हावं, असे शरद पवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागांवर विजय मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला