Suhas Kande on Chhagan Bhujbal : नाशिक : अन्न व नागरी पुरवठा मंत्रीछगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (Shiv Sena) (शिंदे गट) आमदार सुहास कांदेंनी (Suhas Kande) केली आहे. भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगावमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. सुहास कांदे यांच्या मागणीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून चर्चांना उधाण आलं आहे. 


महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष हा विरोधक असलेल्या 'तुतारी' या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. मंत्रीपदं महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र महायुतीचा धर्म न पाळता करायचा. यापेक्षा मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल 'तुतारी'चा प्रचार करावा, असं जाहीर आव्हान आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना केलं आहे. दरम्यान, दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मेळावा आमदार कांदे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी आमदार कांदे हे बोलत होते.              


आमदार सुहास कांदे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणून बुजून तुतारी चालवतोय. याचा अर्थ असाही असू शकतो की, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. काल (बुधवारी) जेवढे राष्ट्रवादीचे नेते होते, त्या सर्वांचे व्हिडीओ आणि फोटो माझ्याकडे आहेत. आपण ही सर्व माहिती भाजप पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांना कळवावी. कारण जर भुजबळांना मंत्रीपद द्यायचं असेल, महायुतीतून आणि काम करायचं असेल तर ते तुतारीचं. भुजबळांना एवढाच जर तुतारीचा पुळका असेल तर त्यांनी महायुतीकडून मिळालेल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल तुतारीचं काम करावं."          


...तर कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा : छगन भुजबळ                 


नांदगाव तालुक्यात शिवसेना मेळावा झाला, यात आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे कार्यकर्ते तुतारीचा प्रचार करतात, असं बोलले. यावर प्रतिक्रिया देतना छगन भुजबळांनी जर कोणाचे आमदारांसोबत पटत नसेल तर कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा, आपले होर्डिंग लावावं मात्र प्रचार महायुतीचाच, करावा असं स्पष्टीकरण दिलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Suhas Kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, शिंदेंच्या आमदाराची मागणी