Parbhani: मराठवाड्यात महाविकास आघाडीचे लोकसभेत निवडून आलेले उमेदवार मराठा आरक्षण ओबीसीमधूनच मिळावे यासाठी समर्थन देणार आहेत का? असा सवाल सर्वसामान्य मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विचारावा असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रथमच मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या खासदारांवर तोफ डागली आहे. परभणीत जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापलेला असताना सर्वच पक्षांनी या विषयात रस घेतल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील नेते मराठा आरक्षणावरून सरकारला धारेवर धरत असताना लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मव्याचे उमेदवार जिंकून आले असल्याची टीका त्यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या खासदारांना जाब विचारा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेत निवडून आलेल्या मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांना जाब विचारा असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नवीन खासदारांना सवाल केला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून जे उमेदवार निवडून आले आहेत ते मराठा आरक्षण ओबीसीमधून मिळावे यासाठी ते समर्थन देणार का? मनोज जरांगे यांनी मागितलेल्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का असा सवाल केलाय. जरांगे पाटलांची भूमिका तुम्हाला मान्य असेल तर तसा जाहीरनामा प्रकाशित करा असं आवाहनही दानवे यांनी केलंय.
'दुसऱ्याच्या ताटातलं काढून देणं भाजपची नीती नाही'
भारतीय जनता पक्ष हा मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनी आहे. मराठा समाजाला भाजपनेत आतापर्यंत आरक्षण दिले आहे. सध्या राज्यात 10% जे आरक्षण चालू आहे ते देखील भाजपनेच दिलंय. फक्त भाजप हा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ शकत नाही. कारण कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देणे ही भाजपची नीती नाही. असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात आज भाजपचे जिल्हा विस्तारित कार्य करणे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेत विरोधी पक्षांवर चांगलाच हल्लाबोल केलाय.
हेही वाचा: