Ambadas Danve on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि.10) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करत जोरदार प्रहार केला. "मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण सुरु आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे.  आताच सांगतो  माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर  सभाही  घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही", अशी टीका राज ठाकरे यांनी केली. दरम्यान राज ठाकरेंच्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 


अंबादास दानवे काय काय म्हणाले?


अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेला मनोज जरांगेंच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही. उलट मग आरोप आम्हालाही करता येतो. तुम्हीच भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेले शिंदे गट यांच्या आडून सर्व राजकारण करत आहात, असं आम्ही म्हणायचं का? हा माझा सवाल आहे. ज्या गावच्या बाभळी असतात, त्याच गावच्या बोरी असतात. हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं. हे मोहोळ सुपाऱ्या वाजवण्यासाठी असतं, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. 


जरांगेच्या आडून आमचं राजकारण सुरु आहे, हे राज ठाकरेंनी प्रुफ करावे


मनोज जरांगेच्या आडून आमचं राजकारण सुरु आहे, हे राज ठाकरेंनी प्रुफ करावे. असं कुठं असायचं काहीच कारण नाही. हे धंदे शिवसेना तर कदापी करणार नाही. अजित पवारांनी जातीचं राजकारण केलं नाही, हा साक्षात्कार यांना आत्ता झाला. तुमच्या मागील काळातील भूमिका पाहिल्या तर मला वाटतं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल. आम्ही फार काही सांगावे अशातील भाग नाही. 


 कोणाच्या घरावर दगड फेकावा असं मला वाटत नाही


रोज जे दलाल आणि टक्केवारी यावर जे रात्रंदिवस असतात त्यांनी कोणाच्या घरावर दगड फेकावा असं मला वाटत नाही, असं प्रत्त्युत्तर दानवे यांनी खासदार नरेश म्हस्के यांना दिलं. बीडमधील आंदोलना शिवसेना भाग होता, ते आम्ही नाकारत नाही. पण ते शिवसेनेचं आंदोलन नव्हतं, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसैनिक आहेत, होते. मात्र, ते शिवसेनेचं नव्हतं. इतर मराठा समाजाचे कार्यकर्तेही त्यामध्ये सामील होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये, सुपारी फेकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंचा इशारा