Nagpur News नागपूर :  उपराजधानी नागपुरात (Nagpur) आज पुन्हा एकदा विदर्भवाद्यांनी आक्रमक पवित्र घेत विशाल मोर्चा काढला आहे. वेगळ्या  विदर्भ राज्याच्या  (Separate Vidarbha) प्रमुख मागणीसह अनेक मागण्या या मोर्च्यातून करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून सुरू झालेला हा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला होता. मात्र, मोठ्या संख्येने जमलेल्या पोलिसांनी या मोर्चाला टेकडी रोडवर थांबवलं असून अनेक विदर्भवाद्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले आहे. यात विदर्भवाद्यांच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी अजूनही मोर्चा टेकडी रोडवर थांबून असून शेकडोंच्या संख्येने आंदोलन त्याच ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहेत. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला असून आज पुन्हा नव्यानं विदर्भवाद्यांनी आपल्या मागण्यासाठी एल्गार पुकारल्याचे चित्र आहे. 


उपराजधानीत पुन्हा विदर्भवाद्यांचा एल्गार 


वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी, तसेच वीज बिल कमी करण्यात यावे, स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घेण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आज माजी आमदार वामनराव चटप आणि इतर विदर्भवादी नेत्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने विदर्भावादी नेते आणि कार्यकर्ते नागपूरच्या यशवंत स्टेडियम जवळ जमले होते. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विदर्भवाद्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. यावेळी हा मोर्चा यशवंत स्टेडियमवरून विधानभवनाच्या दिशेने निघाला असता, पोलिसांनी त्यांना रोखले.


यावरून अनेक विदर्भवादी कार्यकर्ते आणि आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा आग्रह धरला. परिणामी पोलिसांना पोलिसबळाचा वापर करून या आंदोलकांना अडवावे लागले. यावेळी काही विदर्भवाद्यांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलक अधिक आक्रमक झाले असून पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर ही परिस्थिति आटोक्यात आणली. मात्र, सध्याघडीला हे आंदोलक जागीच ठिय्या मांडून असल्याचे बघायला मिळाले आहे.    


काय आहेत प्रमुख मागण्या?


1) केंद्र सरकाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तत्काळ निर्माण करावे
2) विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी आणि शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करावे.
3) विदर्भात येऊ घातलेले दोन्ही औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्यावे.
4) वैधानिक विकास मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे.
5) अन्नधान्यावरील G.S.T. तात्काळ रद्द करावा
6) आष्टी ते आलापल्ली-सुरजागढ हा रस्ता सिमेंट कॉक्रीट मध्ये बांधण्यात यावा.
7) बल्लारपुर-सुरजागढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
8) खामगांव-जालना रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
9) बडनेरा-कारंजा-मंगरुळपीर-वाशिम रेल्वेमार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
10) आर्वी-पुलगांव (शकुंतला) रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये तात्काळ रुपांतर करण्यात यावे.


हे ही वाचा