नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सुरुवात होत असून सर्वच खासदार आज दिल्लीत पोहोचत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि बीडचे (Beed) नेते बजरंग सोनवणे हेही दिल्लीत पोहोचले असून इकडे धनजंय मुंडेंनी भगवान गडावर मुक्काम केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची (Dhananjay munde) पाठराखण केली असून खंडणी प्रकरणात धनंजय गुन्हेगार नाही, हे मी 100 टक्के सांगतो, असे त्यांनी म्हटले. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) यांनीही मत व्यक्त करताना नामदेव शास्त्रींबद्दल पंकजा मुंडेंनी यापूर्वी काय म्हटलं होतं, याची आठवण त्यांनी करुन दिली. तसेच, नामदेव शास्त्री यांचा मी अभ्यास केलेला आहे, तुम्ही करा मग तुम्हाला कळेल, असेही सोनवणे यांनी म्हटले.
पूर्वी नामदेवशास्त्रींबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या, ते व्हायरल झालं होतं. त्यामुळे गड मुंडेंच्या पाठीशी उभं राहतो. पण, ज्याचा खून झाला, ज्याला हाल हाल करून मारलं त्याच्यासाठी गड उभा राहिला पाहिजे, आम्ही त्याच्यासाठी लढतोय, असे म्हणत अप्रत्यक्षपणे खासदार बजरंग सोनवणे यांनी नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सामाजिक सलोखा राखणे ही सगळ्या राजकीय नेत्यांची जबाबदारी आहे, सर्वांनी समोरासमोर बसा. कालच डीपीडीसी बैठक होती, त्यावेळी सगळ्यांनी समोर-समोर बसायचं होतं. कोण सामजिक सलोखा बिघडवतात, जे बाजारात कपडे काढून फिरतात, त्यांचं म्हणणं आहे की मी नैतिक आहे, असे म्हणत सोनवणे यांनी मंत्री धनजंय मुंडेंना लक्ष्य केलं.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही
मुख्यमंत्री म्हणतात की, राजीनामा घेण्याचा अधिकार पक्षाचा आहे, पण राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार निर्णय घेतील आणि अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांमध्येच एकवाक्यता का नाही?, असा सवालही बजरंग सोनवणे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
फक्त राख तपासा
मंत्री असताना यांच्या काळात राखेचे टेंडर किती झाले? तेव्हा नैतिकतेच काय?. माझ्या जिल्ह्यातील एक निष्पाप सरपंचाला तुम्ही मारलंय, ज्यांनी मारलं त्यांचे सगळ्यांचे लागबंधे तुमच्यापर्यंत येतात ना? फक्त राख तपासा, मग नैतिकता कळेल. यांच्या घरातील माणसं रेतीचे धंदे करतात, दादागिरी आणि नैतिकता न ठेवणाऱ्या माणसाचा सर्व गोष्टीतून अंत होतो, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी अप्रत्यक्षपणे धनजंय मुंडेंच्या समर्थनातूनच या गोष्टी होत असल्याचे सूचवले आहे.
तुम्ही नामदेव शास्त्रींचा अभ्यास करा
नामदेवशास्त्री यांचा अधिकार आहे तो, मला त्या फंद्यात पडायचं नाही. नामदेव शास्त्री यांचा मी अभ्यास केलेला आहे, तुम्ही करा मग तुम्हाला कळेल, असेही सोनवणे यांनी पत्रकारांना उद्देशूनच म्हटले.