बीड: सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवले पाहिजे. मग तो कोणीही असला तरी त्याला सोडू नये, त्याला शासन झाले पाहिजे. ही स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून घेऊनही मला लक्ष्य केले जात आहे. संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh Murder Case) मारेकऱ्यांना फासावर लटकवणे महत्त्वाचे आहे की माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन एका समाजाला लक्ष्य करणे महत्त्वाचे आहे, याचा विचार ज्याने-त्याने करावा. गेल्या 53 दिवसांपासून मला याप्रकरणात टार्गेट केले जात आहे. मला इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि अन्य मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे, माझी मिडिया ट्रायल सुरु आहे. मात्र, मी 53 दिवसांमध्ये तोंडातून एक अवाक्षरही काढले नाही, असे वक्तव्य राज्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते शुक्रवारी भगवान गडावरील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर येण्यामागील आपली भूमिका विशद केली. मला मंत्री झाल्यानंतर एकदाही गडावर यायला जमले नाही. बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या वादामुळे मला याठिकाणी यायला जमले नाही. त्यामुळे आपण आता भगवान बाबांचे दर्शन घेऊन मुंबईला जायचे, असे मी ठरवले होते. त्यानुसार मी काल भगवान गडावर दर्शनासाठी आलो होतो. भगवान बाबांचं दर्शन झालं की, शक्ती आणि प्रेरणा मिळते. नामदेव शास्त्री महाराज कधीही राजकीय बोलत नाहीत. मीदेखील त्यांच्याशी राजकीय चर्चा करत नाही. आमच्यात जी काही चर्चा झाली ती अध्यात्मिक होती. बाबा मला ज्ञानेश्वरीतील अनुभव सांगतात. ते सगळे ऐकल्यावर आपल्याला त्यामधून काहीतरी मिळते. हे अनुभव जीवन जगण्यासाठी उपयोगी असतात, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
न्यायाचार्य बाबांनी मुलाखतीत सांगितलं की हा गड माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिशी उभा आहे. याच्यासारखी दुसरी ताकद , शक्ती नाही. न्यायाचार्यांनी गडाचा विश्वास माझ्या पाठिशी उभे करणे ही खूप मोठी ताकद आणि जबाबदारी आहे. संकटाच्या काळात भगवान गड माझ्या पाठिशी उभा राहिला आहे. या शक्तीचं वर्णन मी शब्दांत करु शकत नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
संकटातून बाहेर पडल्यानंतर जनतेची सेवा करणार: धनंजय मुंडे
न्यायाचार्यांनी पंकजा मुंडे यांना भगवान गडाची कन्या ठरवलं आहे. राहिला विषय माझा, तरी मी या गडाचा आणि येथील गादीचा व नामदेव शास्त्रींचा निस्सीम भक्त आहे. याठिकाणी दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळते. गड पाठिशी उभा राहिल्यानंतर आत्मविश्वास येतो. या संकटातून बाहेर पडून जनतेची सेवा करणे, हेच माझे ध्येय आहे. राजकीय वर्तुळात लोक अशी चर्चा करत आहेत की, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांना मंत्रीपद मिळालं आहे, तर काहीतरी केले पाहिजे, असा काहींचा प्रयत्न असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
आणखी वाचा