मुंबई: भारतीय जनता पक्षासोबत (BJP) सख्य असलेले राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी EVM संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झालेले मतदान कुठे गेलं? हे रहस्य असल्याचे त्यांनी भाष्य केलंय. यात त्यांनी यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार राजू पाटील यांचे उदाहरण देत त्यांच्या गावातील हक्काचे मतं कुठे गेलीत? असे म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राजू पाटील यांच्या गावातच चौदाशे मतं होती. मात्र त्यांच्या गावात एकही मत मिळू नये, हे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणालेत. दरम्यान अशाचा तक्रारी राज्यातील शेकडो गावा गावातून आल्या आहेत. ही जादू कशी झाली हे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. 


महाराष्ट्र आज संकटात आहे. हे राज्य खतम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शिवसेना तोडायची, ठाकरे हा ब्रँड संपवायचा, ज्या नावाचं वलय आणि ताकद राज्यात आहे त्या विरोधात दिल्लीतली सत्ता उभी आहे. अशा वेळी सातत्याने भूमिका बदलून चालणार नाही. या संदर्भात भूमिका घेणे हे सर्वच राजकीय पक्षाला महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस आयोगानेच द्यायला पाहिजे, असेही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.


जातीच्या मतांसाठी कायदा नरम अन् वाकलेला- संजय राऊत


देशात आणि राज्यात धर्माचे आणि जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्याच्या मागे जातीचे पाठबळ आहे त्याला कायदा हात लावत नाहीये, कारण मतं जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पावरांचीही तीच मनस्थिती आहे. ज्याच्या मागे जातींची मतं आहे त्याच्यासाठी कायदा हा नरम आणि वाकलेला असतो. शिवाय जे कायद्याचे चौकीदार आहेत, गृहमंत्री, मुख्यमंत्री आहेत ते देखील जातीची ताकद बघून निर्णय घेत असल्याचे दुर्दैवाने या राज्यात सुरू झाले आहे. महाराष्ट्रात जाती जातीचे  राजकारण आणि त्यानुसार नेते वागत आहेत.


भारतीय जनता पक्षाने जेव्हापासून या राज्याची सूत्र आपल्या हाती घेतली, हे राज्य जाती उपजाती पोट जातीमध्ये विभागले गेले आहे. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांनी देखील अशा राजकारणाला खतपाणी घालू नये. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित या राजकारणात सध्या भाजपला चांगले दिवस असल्याची घणाघाती टीका ही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. 


धनंजय मुंडेंबाबत सरकारकडून निव्वळ टोलावा-टोलवी


दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अंतिम निर्णय अजित पवारच घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही एकप्रकारे टोलवा- टोलवी आहे. यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही, देशाचे गृहमंत्री अमित शाह काय करत आहेत. राज्यातले सरकार हे त्यांच्यामुळे आले आहे. त्यांनी EVM सेट केले आहेत. याप्रकरणी ते एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी जनतेच्या दरबारात या प्रकरणी न्याय झाला आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होतं नाही तो पर्यंत लोकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. असेही खासदार संजय राऊत म्हणाले. 


हे ही वाचा