लातूर : लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यामुळे काही जणांनी जीव दिला. तुम्ही असे करू नका. तुम्ही असं करणार असाल तर मी घरी बसू का?  असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी येस्तार येथील ग्रामस्थांना भावनिक साद घातली आहे. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, भाग्य लिहिताना कठीणच लिहिलं आहे, नाहीतर सत्तेत असलेल्या राजा-महाराजा परिवारात मुंडे साहेबांचा जन्म झाला असता. माझा जन्म झाला असता.  वरच्या वर्गात जन्माला घातले असते. मात्र कष्ट करणाऱ्याच्या वर्गात जन्माला घातला आहे. तेथेच सांगितले आहे, तुमचे आयुष्य साधे नाही. दिव्याच्या खाली बसून अभ्यास केला, या देशाला संविधान दिलं, घटना दिली, त्या महामानवाला निवडणूक लढताना अडचण आली आहे. माझी काय औकात आहे. 


तुम्ही असं करत गेला तर, मी घरी बसेन


दुर्दैवानं राजकारण बदलत आहे. पराभव मी त्या क्षणाला स्वीकारला आहे. मी लोकात जाणारा होती मात्र ह्या घटना सुरू झाल्या. काही जणांनी जीव दिला. काय करू आता. कसे बोलू. असे करू नका. तुम्ही असे करत गेला तर मी घरी बसेन. बसू का? येथून पुढे अशी घटना होणार नाही, असे वचन द्या, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजास मुंडे आज लातूर जिल्ह्यातील येस्तार येथे पोहोचल्या होत्या. येस्तार येतील सचिन मुंढे याने पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आत्महत्या केली होती. सचिन मुंडे यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी त्या आल्या होत्या.


मी गळ्याला फास लावून निवडणूक ओढली


2019 मध्ये पराभव झाला होता. आता ही 2024 मध्ये पराभव झाला आहे . माझे तिकीट घोषित झाल्यावर मला कळाले की, मी लोकसभा लढणार आहे. सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात आल्यावर ही मोदीजींसाठी देशासाठी निवडणुकीत उतरले. बैल माने वर जू ठेवतो. मी गळ्याला फास लावून निवडणूक ओढली होती. तुम्ही कश्याला घाबरता आणि आत्महत्या करता. या लोकसभेत आपल्या इशारा वर बारा ते तेरा लाख मत पडली आहेत विधानसभेत 25 ते 30 लाख मते पडतील. घरी बसायचे असेल ना तर हे पूर्ण केल्याशिवाय नाही. ही विधानसभा झाल्याशिवाय नाही. थांबायचे नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.


कात्रीतल्या सुपारी सारखी माझी अवस्था


आमच्या परिवारावर लोकांचे खूप प्रेम आहे. मी मुंडें साहेबाच्या तालमीत तयार झालेले आहे. मी कधीच हतबल झाले नाही. मात्र दहा वर्षानंतर मी अगतिक झाले, भावनिक झाले. तुम्ही माझा परिवार आहे. तुमच्यासाठी मी राजकारणात आले आहे. पाठीचा कणा आपला कधीच गहाण ठेवायचा नाही, स्वाभिमानाने जगा. राजकारणातला माझा प्रवास आपण पाहिला आहे. राजकारणात माझ्यावर किंवा मुंडें साहेबांवर खूप टीका झाली होती. मागील पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून समाजाची वणवण झाली, हे लक्षात येत आहे. माझी अवस्था कात्रितल्या सुपारीसारखी झाली आहे. मला अपराधी असल्यासारखे वाटत आहे. थोडावेळ द्या मला. हात जोडून विनंती करते, असे करू नका, असे भावनिक साद पंकजा मुंडे यांनी दिली. 


स्वतःची काळजी घ्या, 90 दिवस राहिले आहेत


स्वतःची काळजी घ्या तुम्ही सुखी तर मी सुखी. मी एवढीच विनंती करते, तुमच्याशिवाय माझे कोण आहे. सगळ्या बाबी बाजूला ठेवा. विधानसभेला 90 दिवस राहिले आहेत. जीव लावून काम करू. माझ्यावर विश्वास ठेवा असे कसे सांगू. देव पण साथ देत नाही, मात्र काम करत राहू, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती.