मुंबई : लोकसभा निवडणूक निकालात मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत ठरला. कारण, या मतदारसंघात शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra waikar) हे केवळ 48 मतांनी विजयी झाले आहेत. तर, अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. मात्र, येथील मतदारसंघात मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप शिवसेनेच्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्याकडून केला जात आहे. त्याच अनुषंगाने आज शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. दुसरीकडे या निकालावरुन शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामनाही रंगल्याचं दिसून येते. त्याच वादातून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी 4 जून,2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्यावर शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रवींद्र वायकर यांनी निवडणूक लढवली होती. 4 जून रोजी नेस्को सेंटर येथे मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या दिवशी ज्यांना ज्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आली होती, त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना विधानपरिषदचे सदस्य विलास पोतनीस यांनी आपल्या शस्त्रधारी पोलीस वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी 4 ते रात्री 8 या दरम्यान प्रवेश केला. त्यांच्यासोबत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी केंद्रात प्रेवश केला होता, अशी तक्रार याबाबत रवींद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती.


तक्रारीची दखल घेऊन गुन्हा


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रवेशाचे ओळखपत्र नसेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असताना अमोल कीतर्किर आणि विलास पोतनीस यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग करत मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी केली होती. वायकर यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन वनराई पोलिसांनी आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


अगोदरच दोघांविरुद्ध गुन्हा


दरम्यान, उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाला वादाचा मुद्दा बनला असून शिवसेना ठाकरे गटाने या निकालाला न्यायालयात आव्हान दिले आहे. दुसरीकडे मतमोजणीवेळी गैरव्यवहार झाल्याने याप्रकरणी रवींद्र वायकर आणि निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी गुरव यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत.