(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Munde: पंकजा मुंडेंच्या भाषणाची झोकात सुरुवात, लक्ष्मण हाकेंना बघताच म्हणाल्या, हे गोंडस लेकरु...
Pankaja Munde Speech: पंकजा मुंडेंच्या भाषणाची झोकात सुरुवात, व्यासपीठावरील मान्यवरांची लांबलचक यादी वाचताना दमछाक.
बीड: लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरासारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही. पण लक्ष्मण हाके (Laxman Hake) याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भगवान बाबा आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला वंदन केले. मी याठिकाणी हाकेंचे स्वागत करते, असे वक्तव्य पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर (Dussehra Melava 2024) बीडमधील भगवान गडावरील मेळाव्यात भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले.
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन पंकजा मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करुन दिली. ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाकेदेखील या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांची ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी हाके यांचा गोंडस लेकरु असा उल्लेख केला. तेव्हा उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. यानंतर पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महादेव जानकर (Mahadev Jankar), मोनिका राजळे (Monika Rajle), मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस (Suresh Dhas) , नाना करपे , वाघमारे नवनाथ, सदाशिव खाडे, माजी आमदार खंदारे, डॉ. सुनील कायंदे, योगेश जाधव, राधाताई सानप, बाळासाहेब आसबे, अरुण मुंडे, अनिल तांदळे, रामदास बढे, वाल्मीक कराड अशा मान्यवरांची लांबलाचक यादी वाचत त्यांचे स्वागत केले.
पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमान व्यासपीठावर
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपला मुलगा आर्यमान याची ओळख उपस्थितांना करुन दिली. पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला आवर्जून जवळ बोलावून घेतले आणि त्याची ओळख करुन देताना म्हटले की, हा माझा मुलगा आर्यमान, भगवान बाबांच्या दर्शनाला आलाय. मी माझ्या मुलाला सांगितलं की, मला तुझ्यापेक्षा ही जनता जास्त प्रिय आहे. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तेव्हा या लोकांनी 12 कोटी रुपये जमा केले. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मीदेखील तुमच्यावर पोटच्या लेकरापेक्षा जास्त माया करते की नाही? तुम्ही घरच्यांपेक्षा जास्त जीव मला लावता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आचारसंहिता लागल्यावर मुख्य भूमिका मांडणार, तो पर्यंत वाट पाहणार , मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा