बीड: दसरा मेळाव्याचे औचित्य साधून राज्यांमध्ये अनेक राजकीय पक्ष संघटना हे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. मात्र, या दिवशी होणाऱ्या राजकीय मेळाव्यांना (Dussehra Melava 2024) वेगळं महत्त्व असतं. बीड जिल्ह्यात पारंपरिक भगवान भक्ती गडाचा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असतानाच तिकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नारायण गडावरती दसरा मेळावा होणार आहे. त्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.


भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी स्टेज बनवण्यात येत आहे त्यासोबतच या ठिकाणी आलेल्या मुंडे समर्थकांसाठी बसण्याची व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे या व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. 


राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. मराठा फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड मतदरासंघात धक्कादायक पराभव झाला होता. शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषेदवर पाठवून भाजपकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते. विधानसभेलाही मराठा आणि ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भगवान गडावरुन काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करणार का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास मनोज जरांगे हे नारायण गडावरील मेळाव्यातून या टीकेला प्रत्युत्तर देऊ शकतात. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर बीड आणि मराठवाड्यात निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.


राज्यात कुठे-कुठे दसरा मेळावे


* कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्याची महाराष्ट्रभर चर्चा असते. राजगादीचा मान असल्याने या सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते.


* नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा यंदाही परंपरेनुसार होणार आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार, हे पाहावे लागेल. या माध्यमातून संघाच्या स्वयंसेवकांना पुढील दिशेबाबत मार्गदर्शन आणि संदेश दिला जातो. 


* उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.


* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात सध्या भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. 


* मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. 


आणखी वाचा


ठाकरे, मुंडेंनंतर आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'या' महत्त्वाच्या ठिकाणी करणार शक्तिप्रदर्शन; हालचालींना वेग!