छत्रपती संभाजीनगर : राज्यात दरवर्षी शिवसेनेचा (Shiv sena) दसरा मेळावा, आरएसएसचा (RSS) दसरा मेळावा, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा होत असतो. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. आता या दसरा मेळाव्यात आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) तीव्र लढा उभारला आहे. सरकारने आठवडाभर उपोषण करुन देखील आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले आहेत. यानंतर आता मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती येत आहे.
दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी आज नारायण गडावर बैठक
या मेळाव्याच्या नियोजनासाठी आज बीडच्या नारायणगड (Narayangad) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत मेळाव्याची रूपरेषा ठरणार आहे. या बैठकीला बीड (Beed) जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण देखील ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.
जरांगेंच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरु होणार?
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे समर्थकांना दसरा मेळाव्यातून संबोधित करतात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करतात. शिवसेना फुटीनंतर तर एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यातून शक्तिपर्दर्शन करण्याची संधी सोडली नाही. त्यात आता मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख दसरा मेळावे
1. शिवसेना (उबाठा) शिवाजी पार्क.
2.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग, नागपूर.
3. मुख्यमंत्री एककनाथ शिंदे, आझाद मैदान, मुंबई.
4. पंकजा मुंडे, सावरगाव घाट.
इतर महत्त्वाच्या बातम्या