पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही, सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

शिर्डी : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची (Pakistan) कोंडी करणारे 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, 24 एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतय, असे प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी म्हटलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा करार रद्द केल्याचं खोटं सांगितलं जातय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेलं पत्रच त्यांनी दाखवलं. या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को अस हे पत्र. त्यामुळे जनतेला हे पत्र दाखवलं तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करतंय हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये. या सगळ्यात फक्त पाकिस्तानी नागरिकांचा भुसार रद्द करून त्यांना बाहेर काढता येत आहे, एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.
इंडस कराराबात मांडली भूमिका
सिंधू जल कराराबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, कोणताही करारनामा लगेच रद्द करता येत नाही, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. पण मी म्हणतो भाडमध्ये गेलं ते रद्द केलाय तर केला रद्द. मात्र, त्याची फॉलोअप ऍक्शन घ्या ना. जे समोर आलं त्यात धरणातील गाळ काढणार, पाणी अडवणार याला 10 वर्षे लागतील, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
पाकिस्तानी नेत्यांच्या वक्तव्यावर भूमिका
पाकिस्तानी नेत्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत.
2 मे रोजी निदर्शन करणार
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान आर्मी चीफने केलेलं भाषण महत्त्वाचं आहे. त्यामध्ये त्याने टू नेशन थेअरी मांडली. आपल्या इंटेलिजन्स विभागाने ही माहिती देखील सरकारला दिली. मात्र, त्यावेळी सरकार झोपून राहिलं. कोणत्याही सूचना दिल्या नाही. आज आपलं सैन्य पूर्णपणे तयार आहे. इस पार.. या उस पार. मात्र, पॉलिटिकल लीडरशिपमध्ये ती इच्छा दिसत नाही. त्यामुळे, सरकारमध्ये इच्छाशक्ती व्हावी यासाठी 2 मे ला हुतात्मा स्मारकासमोर आपण निदर्शने करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारने संरक्षण दिले पाहिजे
जळगावमधील प्रेमविवाहानंतर झालेल्या हत्याकांडाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. जातीच्या बाहेर जाऊन लग्न करणाऱ्यांची काळजी सरकारने घेतली पाहिजे. जातीच्या बाहेर जाऊन लग्न केलं आणि कुटुंबाने जर हिंसा केली तर त्यापासून संरक्षण सरकारने दिले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
हेही वाचा
लपून बसलेल्या 107 जणांना पोलीस शोधतील अन् तिथेच ठोकतील; एकनाथ शिंदेंचा गर्भित इशारा
























