मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांच्यात जागावाटपावरून चर्चा चालू आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) जास्त जागा हव्या असल्यामुळे वंचितच्या मविआतील समावेशावर अंतिम तोडगा निघालेला नाही. याच कारणामुळे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली आहे. असे असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उदयास येऊ शकते. कारण ओबीसी समाजाचे नेते तथा ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. या भेटीत लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) एकत्र लढवण्यावर चर्चा झाली आहे. 


...तर राज्यात भूकंप होईल


प्रकाश शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या राजगृह या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.या भेटीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शेंडगे यांनी या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी होईल आणि राज्यात राजकीय भूकंप राज्यात होईल असे भाकित केले. 


22 जागांवर उमेदवार देण्याची तयारी


यापूर्वी प्रकाश शेंडगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तीन बैठका झाल्या आहेत. 23 मार्च रोजीच्या बैठकीनंतर शेंडगे यांनी राज्यात तिसरी आघाडी होईल अशी अशा व्यक्त केली. ओबीसी बहुजन पार्टी आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र ताकतीने लढतील. आम्ही 22 जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. आमच्याकडे यादीदेखील तयार आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. 


आमचे लाखांचे मेळावे झाले


तसेच आमचे याआधी लाखांचे मेळावे झाले आहेत. आरक्षणाचं समर्थन करणाऱ्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदाने केले पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा चालू आहे. त्यांच्या या चर्चेत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. असे असताना प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो तर राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


आम्हाला कोणीही कमी लेखू नये


महाराष्ट्राने ओबीसी मेळाव्यांच्या माध्यमातून ओबीसींची ताकद पाहिलेली आहे. राज्यातील ओबीसी, भटका विमुक्त समाज जागा झाला आहे. हा समाज फक्त निवडणुकीची वाट पाहतोय. त्यामुळे आम्हाला कोणीही कमी लेखू नये. आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान करावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. 


प्रकाश शेंडगे कोणकोणत्या जागांवर उमेदवार देणार? 


प्रकाश शेंडगे यांनी 48 मतदारसंघांपैकी एकूण 22 मतदारसंघांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. तसा प्रस्तावही त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलाय. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सांगली, बारामती, माढा, हातकणंगले, मावळ आणि सातारा तसेच मराठवाड्यातील बीड, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, धाराशिव उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी, अहमदनगर विदर्भातील वर्धा, यवतमाळ-वाशिम कोकणातील ठाणे, रत्नागिरी मुंबईतील ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे.