मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाने 13 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला (Congress) पाठिंबा दिल्याने पक्षाचे संख्याबळ 14 वर गेले आहे. साहजिकच यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच काही नेत्यांनी 'मविआत आम्हीच मोठा भाऊ, अशा धाटणीची भाषा सुरु केली आहे.  याविषयी मविआच्या मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिताफीने पुढाकार घेत या प्रश्नाचे उत्तर दिले.


पृ्थ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात बसून सर्वात चांगला उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचा संदर्भ घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल.  हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आमची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करु नका, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.


पृथ्वीराज चव्हाणांनी मानले मतदारांचे आभार


या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील आणि देशातील मतदारांचे आभार मानले. लोकशाही वाचवण्यात महाराष्ट्रातील जनतेने निर्णायक भूमिका बजावली. या निवडणुकीत आम्ही धनशक्ती, तपासयंत्रणा या आव्हानांना तोंड दिलं. लोकसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. पण निकाल पाहता या प्रयत्नांना यश मिळाले नाही, हे स्पष्ट होत झाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेची निवडणूकही याच ताकदीने लढवू. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आम्ही लवकरच आवश्यक ते निर्णय घेऊ, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.


आणखी वाचा


विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल; शरद पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला


फडणवीसांकडून फेक नरेटिव्हचा आरोप, उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर; शरद पवारांनी करुन दिली म्हशीची आठवण