Nitin Gadkari Interview : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी (BJP Lok Sabha Candidate List) जाहीर केली आणि त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) नाव नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर नितीन गडकरींचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. नंतर आलेल्या यादीमध्ये मात्र त्यांचं नाव होतं. यावर नितीन गडकरींनी पहिल्यांदाच भाष्य केलं. पहिल्या यादीत त्याचं नाव का नव्हतं याचं कारण त्यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.
'एबीपी न्यूज'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी सांगितले की, "आमच्या पक्षात एक व्यवस्था आहे. सर्वप्रथम भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व प्रमुख संसदीय मंडळाशी चर्चा करतात. यावेळी पहिल्या यादीवेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या या तीन राज्यातील टीमशी चर्चा करण्यात आली होती. त्यानतंर या तीनही राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्राची चर्चा झाली त्यावेळी नाव आलं
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "पहिल्या यादीवेळी महाराष्ट्राची अजिबात चर्चा झाली नाही. महाराष्ट्राची चर्चा झाली तेव्हा त्या यादीत माझे नाव आले. त्यामागे कोणतेही विशेष कारण किंवा उद्दिष्ट नव्हते. आता कोणतेही कारण नसतानाही विरोधी पक्षातील काही लोक त्याबद्दल अनावश्यकपणे बोलले."
उद्धव ठाकरेंकडून खरंच ऑफर होती का?
शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर आली आहे का असं विचारले असता नितीन गडकरी म्हणाले की, मी भाजपचा कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) स्वयंसेवक आहे. विचारधारा हा माझ्या जीवनातील दृढ विश्वासांचा एक भाग आहे. अशा स्थितीत मी माझ्या पक्षातच राहणार असून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नरेंद्र मोदींसोबतच्या मतभेद आहेत का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुमचे काही मतभेद आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले की, असं काहीही नाही, या सर्व चर्चा निराधार आहेत. मी अनेकदा पंतप्रधान मोदींशी बोलतो. संघटना आणि देशासाठी आम्ही सर्वजण मिळून काम करतो.
नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा: