पुणे:  मराठा व्होटबँकेची ताकद दाखवून देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार रिंगणात उतरवा, असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिला होता. प्रत्येक जिल्ह्यात गावपातळीवर चर्चा करुन एकाच उमेवाराची निवड करा. एकापेक्षा अधिक मराठा उमेदवार रिंगणात असल्यास मराठा मतांची विभागणी होईल. त्यामुळे आपापसात चर्चा करुन एकच मराठा उमेदवार रिंगणात उतरवा, असे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सांगितले होते. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलक कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार, याची चर्चा सुरु झाली होती. या सगळ्या घडामोडी सुरु असताना पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनसेचे माजी नेते वसंत मोरे (Vasant More) हे सध्या पुण्यातील मराठा आंदोलकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हेच मराठा समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. तसे घडल्यास पुणे लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.


वसंत मोरे यांनी मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही, यासाठी मराठा समाजाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या बैठकीत वसंत मोरे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर वसंत मोरे आता मराठा समाजाकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत का, यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास काय होईल?


वसंत मोरे यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या भेटीनंतर एक सूचक वक्तव्य केले होते. पुणे लोकसभा निवडणुकीत यंदा वेगळा प्रयोग पाहायला मिळेल, असे वसंत तात्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीला पोहोचल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा एक उमेदवार रिंगणात पाहायला मिळू शकतो. वसंत मोरे हे नगरसेवक असले तरी पुण्यात त्यांचे नाव सर्वांना परिचित आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर तात्यांची हवा असते. त्यामुळे मराठा समाजाच्यादृष्टीने पुणे लोकसभेत वसंत मोरे हे ताकदीचा उमेदवार ठरु शकतात. वसंत मोरे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा लढवणारच, अशी घोषणा केली आहे.  त्यामुळे आता पुण्यातील मराठा समाज वसंत मोरे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी करणार का, हे आता पाहावे लागेल.


आणखी वाचा


मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते, मी पुणे लोकसभा लढवणारच, वसंत मोरे यांचा निर्धार