Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी राणे परिवाराने मात्र प्रचाराला सुरूवात केल्याचं दिसतंय. त्यातच आता आमदार आणि नारायण राणेंचे (Narayan Rane) सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मतदारांना धमकीवजा इशारा दिल्याचं दिसतंय. रत्नागिरी सिंधुदुर्गंमधून नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असं आवाहन भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. तसेच जिथे कमी लीड मिळेल, तिथे विकासनिधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही असा इशाराही त्यांनी दिला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, मात्र नितेश राणे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी झालेच पाहिजेत असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, जेव्हा नारायण राणे उमेदवार म्हणून समोर असतील तेव्हा 80 ते 85 टक्के मतदान आपल्याला करायचे आहे. सर्वांचा हिशोब मी घेऊन बसणार आहे. जिथे लीड कमी मिळेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही. नारायण राणे यांचा विजय मला पाहिजे म्हणजे पाहिजेच.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची लोकांना घाई
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केल्याचं दिसतंय. नारायण राणेंनी आता तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. उमेदवार जाहीर होण्याआधी, दिवस कमी राहिल्याने आपण मोदींचे कार्य घेऊन लोकांपर्यंत जात आहोत. मोदींच्या बाजूने वन साईड मतदान करण्याची लोकांना विनंती या मेळाव्यातून करतोय असे राणेंनी सांगितले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करतो अशी घाई लोकांना झाली असल्याचंही नारायण राणे यांनी सांगितले.
उमेदवाराचं नाव घोषित नाही
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याबद्दल महायुतीमध्ये अद्याप संभ्रम असल्याचं दिसतंय. या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडूनही दावा सांगण्यात आला आहे. जागावाटपाची चर्चा संपली असली तरीही रत्नागिरीची जागा कुणाला जाणार हे अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल संभ्रम आहे.
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणाहून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. परंतु हा मतदारसंघ आता भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आता प्रचारालाही सुरूवात केल्याचं दिसतंय.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना अचानक वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. त्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेला या मतदारसंघात जागा मिळेल मी नाही हे सांगू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. किरण सामंत यांना तिकीट मिळेल की नाही सांगता येत नाही, मात्र ते निष्ठावानपणे प्रचार करतील असं दीपक केसरकर यांनी वक्तव्य केल्याने ही जागा आता भाजपला सुटल्याची चर्चा आहे.
ही बातनी वाचा: