पुणे : भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरुन सध्या जोरकसपणे आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पोलिसांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काही पोलिसांकडून हिंदूंना डावललं जात असल्याचं सांगत नितेश राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. सध्या हिंदू जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून ते दौरा करत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या यात्रेला विरोध करत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत राणेंच्या यात्रेला विरोध केल्याचं दिसून आलं. यावेळी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूरमधील गढीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आमदार नितेश राणे, ह.भ.प.संग्राम बापू भंडारे पाटील, सागर भैया बेग यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आलाय. मात्र, या मोर्चादरम्यान काही मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणाबाजी करत यात्रेला विरोध केला आहे. एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. नितेश राणे गो बॅक, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा सरदार वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात असलेल्या ऐतिहासिक गढीवरील झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असून याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शवला. राणे यांचा मोर्चा नेहरू चौकातून मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सकल मराठा समाजाचे आंदोलक जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. तसेच, जवळपास दहा आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. आश्रम फरतडे नावाच्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. तसेच, इंदापूर नगरपरिषदेसमोर सुरू असलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चा सभा सुरू असताना प्रेक्षकात बसलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाजीह केली.
इंद्रेश्वर मंदिरात राणेंनी केली महाआरती
दरम्यान, राणे यांनी इंदापूरचे ग्रामदैवत असलेल्या इंद्रेश्वर मंदिरात जाऊन इंद्रेश्वर महादेवाची पूजा करतो करत इंद्रेश्वर महादेवाचे महाआरती देखील राणे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. त्यानंतर जय श्रीराम चा नारा देत हा मोर्चा इंदापूर शहरातील नगरपरिषदे समोरील मैदानात दाखल झाला आहे या ठिकाणी राणे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. दरम्यान या मोर्चाला सकल मराठा समाज तसेच विविध सामाजिक संघटना आणि राजकीय विरोध दर्शवलेला आहे त्यामुळे इंदापूर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.
हेही वाचा
महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात, जाहीर पाठिंबा