Jay Pawar Karjat Vidhan Sabha: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र जय पवार यांनी आज कर्जत दौरा केला. यावेळी जय पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांच्या कर्जत दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. 


शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघाचे (Karjat Jamkhed) आमदार आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या मतदारसंघात जय पवार (Jay Pawar) यांनी अचानक दौरा केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात, असं विधान केलं होतं. त्यानंतर आज जय पवार यांनी कर्जतचा दौरा केल्यानं विविध चर्चा रंगल्या आहेत. 


जय पवार यांनी घेतले गोदड महाराजांचे दर्शन


जय पवार यांनी आज कर्जत येथे येऊन काही कार्यकर्त्यांची भेट घेतली तसेच कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी काही निवडक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मात्र जय पवार यांच्या कर्जत दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली असून काही दिवसांपूर्वीच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जे सुतोवाच केले होते की माझ्याही मतदारसंघात अजित पवार निवडणुकीची चाचपणी करत आहेत या वक्तव्याला आता दुजोरा मिळाला असून जय पवार यांचा अचानकपणे विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जत दौरा हा आता चर्चेचा विषय झाला आहे तसेच यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवले म्हणून भेटण्यासाठी आलो होतो आणि जर मला पुन्हा बोलवलं तर मी पुन्हा येईल, असे वक्तव्य ही जय पवारांनी केले आहे.


रोहित पवार काय म्हणाले होते?


अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात, अशी चर्चा रोहित पवार यांच्या ट्विटमुळे सुरु झाली. अजित पवार यांनी नुकतीच, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात माझ्या पत्नीला उभे करणे ही चूक होती, अशी जाहीर कबुली एका मुलाखतीत दिली होती. अजित पवारांच्या या कबुलीनंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले होते की, सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही चूक झाल्याचे नाव देत असलात, तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची, चर्चा आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. 


संबंधित बातमी-


मला रस नाही, मी सात-आठवेळा आमदार, जय पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीवर अजित पवारांचं रोखठोक भाष्य