अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Seat) दोन निलेश लंके (Nilesh Lanke) नावाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावरुन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या प्रकरणावरुन भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  


निलेश लंके यांचं ट्विट


निलेश लंके यांनी ट्विट करुन सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे. "सुजयजी मानले तुम्हाला, माझ्या नावाचा साम्य असलेला उमेदवार तुमच्या माध्यमातून अर्ज दाखल करतो अगदी तुमच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या डमी कारभारासारखाच.. परीक्षेला नापास होणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते आणि डमी विद्यार्थी पुढे करावा लागतो, पैशाच्या बळावर उमेदवार डमी उभा कराल ही.. पण मतदान रुपी जनता डमी तयार करता येत नाही एवढं लक्षात ठेवा. परीक्षेच्या आधीच नापास झालेला विद्यार्थी" अशा शब्दात निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.


केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, पण आता जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी!, असं निलेश लंके म्हणाले आहेत. 






महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच निलेश लंके यांच्या नावाचे साधर्म्य असलेला डमी उमेदवार दिल्याचा आरोप मविआने पत्रकार परिषदेतून केला आहे. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे.


नगर दक्षिणमध्ये 43 उमेदवारांकडून अर्ज  


सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 32 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. काल नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 27 उमेदवार आणि यापूर्वी नामनिर्देशन पत्रदाखल केलेले 16 उमेदवार अशा प्रकारे नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 43 एवढी झाली आहे. 26 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.


दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. 


संबंधित बातम्या :


 Lok Sabha Election 2024: धक्कादायक! मतदान न करताच बोटाला शाई लावा अन् पैसे मिळवा; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने केला पर्दाफाश


 Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात