नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली असून आता विधानपरिषद निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे (Mahayuti) उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये जोरदार भाषण केलं. यावेळी, नोव्हेंबरनंतर आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री (Chief minister) असेल, असे राऊत यांनी म्हटले.  नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदिप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला. राऊत यांनी सुरुवातीलाच बोगस मतदारांवर भाष्य केले.


मुबंईमधील आमचा अनुभव वाईट आहे, सर्वाधिक मत पदवीधर मतदारसंघात होतात, याची कारणे शोधावे लागेल. आम्ही राजकारणातील लोक आहोत आम्ही हेराफेरी करतो, मतदार आणतो, बसवतो. इतरांना शिकवे ब्रम्हद्यान आणि स्वतः कोरडे पाषण. पण, इथे बोगस शिक्षक, बोगस शिक्षकेत्तर कर्मचारी नोंदविले गेले आहेत. त्यामुळे, बोगस मदतदार शोधून काढावेत, त्यांच्यावर खटले दाखल करावे, त्यांची नोदणी करणाऱ्यांवरही खटले दाखल करावे, असे राऊत यांनी म्हटले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री आलते, त्यांचा आणि शिक्षणाचा सबंध काय आहे का, दोन अडीच वर्षात शिक्षण संबंधी काही बोलले का, मला दाखवा. शिक्षण क्षेत्राचा भाव लावला, हे चुकीचे आहे, असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच, त्यांचा उमेदवार म्हणतो शिक्षकांना गुलाम बनवेल. शेतकरी आणि शिक्षक या राज्यात समाधानी नाही. शिक्षकी पेशाला देशांत मान सन्मान होता, मात्र आता दिसत नाही, शिक्षणाचा व्यापार झाला नव्हता. शिक्षक मतदार संघांची निवडणूक सोपी नाही, 54 तालुक्यांचा मतदारसंघ आहे. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेपेक्षा तुमची यात्रा मोठी आहे, मतदार संघ पिंजून काढणें सोपे नाही, असेही राऊत यांनी म्हटले. तसेच,  10 वर्षात शिक्षकांच्या हातात भिकेचा कटोरा दिला, अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनांसाठी भांडत आहोत, देशाचे पंतप्रधान अनेक विषयांवर बोलतात, मन की बात करतात. सरकार पाडण्यासाठी 50 कोटी आले, मत विकत घेण्यासाठी खोके आले, पण शिक्षकांसाठी पैसे नाहीत. शिक्षकांच्या मतावर जे निवडून आलेत त्या प्रतिनिधींनी तरी सभागृहात जोरकसपणे आवाज उठवला आहे का, अनेक प्रश्नांवर सभागृह बंद पडले जातात, पण शिक्षक प्रश्नवर कधी आवाज उठवला का, असा सवालही खासदार राऊत यांनी विचारला. 


मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा


शिक्षण क्षेत्र, शाळेशी सबंध नसलेले राज्यकर्ते लाभले म्हणून आपल्याला शिक्षण क्षेत्रात काही बदल होताना दिसत नाही. मी आणि उध्दव ठाकरे आम्ही बैठका घेतो, फोन करतो म्हणून मुख्यमंत्री यांचे धाबे दणाणले आहेत म्हणून ते इकडे फिरत आहेत. लोकांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले. 


नितीन ठाकरे तुम्ही निर्णय घ्या


आश्रमशाळांचे प्रश्न आधी का सोडवले नाहीत, निवडणूक आल्यावर का बोलतात. अडीच वर्षे काय केले. उद्धव ठाकरे यांच्या काळात अंगणवाडी सेविकांचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा घरपोच पगार दिला. गमतीशीर उमेदवार आहेत, एक साखरसम्राट उभे आहेत त्यांनी कारखाना चालवावा, एक मद्यसम्राट आहेत तुम्ही गुत्यावर बसा. मविप्र संस्थेचे सभासद खासदार झाले, संचालक आमदार होतील, सरचिटणीस असणारे नितीन ठाकरे तुमचे काय? तुम्ही निर्णय घ्या गळ्यात भगवी मफलर घाला, असे म्हणत स्थानिक नेत्यांना आवाहनही केले. 


नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री


माझी बायको शिक्षिका आहे, त्यामुळे मी शिक्षकांविषयी आत्मियतेने बोलतो. मला सर्व प्रश्न माहिती आहेत. या निवडणुकीत आपल्याला पहिली फेरी दूसरी फेरी अशा फेऱ्यामध्ये अडकायचे नाही. पहिल्या फेरीतच 40 हजार मतदान घेऊन आपला उमेदवार निवडून येणार असल्याचे राऊत यांनी म्हटलं. तसेच, नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री होणार आहे, अशी जाहीर घोषणाही राऊत यांनी नाशिकमधील मेळाव्यातून केली. मात्र, महाविकास आघाडीत अद्यापही मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलं नसताना, राऊतांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत यावर चर्चा होणार हे नक्की.