अहमदनगर : सभागृहात अनेक महत्त्वाच्या चर्चा सुरू असताना काही नेते झोपा काढत असल्याचं नेहमीच आपण पाहतो. आता पत्रकार परिषदेतही हे नेते झोपा काढताना दिसत आहेत. शिर्डीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्या बाजूला बसलेले राजू वाघमारे (Dr Raju Waghmare) चक्क झोपले होते. शेवटी निलम गोऱ्हे यांनी त्यांना 'उठा आता' म्हटल्यावर वाघमारे खडबडून जागे झाले. हा प्रसंग माध्यमांच्या कॅमेरात कैद झाला.
काँग्रेसमधून नुकतेच शिंदेच्या शिवसेनेत गेलेले राजू वाघमारे आणि विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे हे शिर्डीमध्ये लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी निलम गोऱ्हे या पत्रकारांशी संवाद साधत होत्या. पण त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले राजू वाघमारे हे चक्क झोपले होते. बराच वेळ माध्यमांचा कॅमेरा हा त्यांच्यावर होता. पण तरीही ते झोपलेलेच दिसले. शेवटी निलम गोऱ्हे यांचं त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी राजू वाघमारेंना उठवलं. 'उठा आता' असं निलम गोऱ्हे यांनी म्हटल्यानंतर राजू वाघमारे खडबडून जागे झाले.
राजू वाघमारे या आधी काँग्रेसचे प्रवक्ते होते. पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राज्यातले काँग्रेसचे नेते हे उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर चालतात, शरद पवारांच्या मताने चालतात असा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.
शिर्डीत दोन्ही सेना एकमेकांना भिडणार
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत रंगणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव असून पूर्वी या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. 2009 नंतर झालेल्या सर्व निवडणुकीमध्ये शिवसेनेने या जागेवर विजय मिळवला. गेल्या वेळी निवडून आलेले सदाशिव लोखंडे हे नंतर शिंदेंसोबत गेले.
सन 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता. परंतु आता वाकचौरे हे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत.
ही बातमी वाचा:
- Vishal Patil : दबावतंत्रानंतरही सांगली लोकसभेला विशाल पाटलांनी शड्डू ठोकला; माघार नाहीच, काँग्रेस काय भूमिका घेणार?