मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमध्ये याआधी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार याद्या जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. असं असलं तरी काही जागांवरुन महाविकास आघाडीमध्ये अजूनही काथ्याकूट सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजून काही जागांवर निर्णय झालेला नाही. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर, दोन्ही बाजूंकडून पूर्वी जिंकलेल्या जागांवर दावा करण्यात आला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आहे. 


कोणकोणत्या जागांवर अद्याप निर्णय नाही?


अजित पवार - धाराशिव लोकसभा मतदारसंघ


धाराशिव लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत धाराशिवची जागा मिळाली आहे. या जागेवरुन राणा जगजित सिंह यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी सुरुवातीपासूनच अजित पवार यांची होती. मात्र राणा जगजीत सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर भाजपच्यावतीने सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांचं नाव सुचवण्यात आलं. मात्र प्रवीण परदेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर न लढता भाजपच्या चिन्हावर लढण्याची अट ठेवल्याने त्यांचे देखील नाव बारगळलं.


त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विक्रम काळे, सुरेश बिराजदार आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांच्यासोबत सोमवारी पार पडलेल्या बैठकीत विक्रम काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊन निर्णय देखील जाहीर करण्यात येणार होता. मात्र अचानक पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आणि उमेदवाराचे नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.


सध्या या ठिकाणाहून राणा जगजीत सिंह यांची पत्नी अर्चना पाटील इच्छुक असल्याची माहिती आहे अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज किंवा उद्या प्रवेश होईल आणि त्यानंतर अर्चना पाटील या घड्याळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जातील अशी सूत्रांची माहिती आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष


1)  माढा लोकसभा मतदारसंघ


माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच महादेव जानकर महाविकास आघाडीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू होती. मात्र महादेव जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना परभणीचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामुळे ऐनवेळी शरदचंद्र पवार पक्षाची गोची झाल्याचे पाहायला मिळालं सध्या या ठिकाणाहून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक असल्याची माहिती आहे मात्र मागच्या दीड आठवड्यापासून त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकलेला नाही. कारण केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागण्याची भीती मोहिते पाटील यांना आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोहिते पाटील यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर करताच केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे सुरू होणार अशी चाहूल मोहिते पाटील कुटुंबाला लागली आहे. 


सध्या माढ्यातून राष्ट्रवादीतूनच अभयसिंह जगताप, शेकाप पक्षातून गणपतराव देशमुख  यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख हे देखील इच्छुक आहेत


२) सातारा लोकसभा 


सातारा लोकसभेसाठी सुरुवातीपासून श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढावी अशी आग्रही मागणी शरद पवार यांनी केली होती मात्र मागील आठवड्यात सातारमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचे कारण देत निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली. त्यानंतर या ठिकाणाहून बाळासाहेब पाटील, सुनील माने यांच्या नावावर चर्चा सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढावी अशी चर्चा सुरू झाली. नुकतीच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट देखील घेतली. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर न लढता आपण पंजावर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणचा निर्णय अद्याप मार्गी लागलेला नाही


3) बीड लोकसभा


बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे आणि ज्योती मेटे हे इच्छुक आहेत. ज्योती मेटे यांच्या बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे तर बजरंग बप्पा सोनवणे यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात देखील केली आहे मात्र बीड लोकसभा मतदारसंघातील सद्य परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांच्या विरोधात जर महिला उमेदवार आला आणि तो मराठा उमेदवार असेल तर याचा फायदा उमेदवार निवडून येण्यास होऊ शकेल असा कायास शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वर्तवण्यात येत असल्याने, ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेशासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्योती मेटे यांच्यासमोर शिवसंग्राम पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विलीन करावा अशी अट ठेवण्यात आली होती. यावर सध्या चर्चा सुरू असून ज्योती मेटे थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती स्वतः मेटे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 


4) रावेर लोकसभा


रावेर लोकसभा मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढाई रंगणार अशी चर्चा असताना एकनाथ खडसे यांनी अचानक माघार घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची गोची झाल्याचे पाहायला मिळालं. सध्या या ठिकाणाहून उमेदवाराची चाचणी सुरू असून पक्षाच्या वतीने तीन ते चार उमेदवारांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही.


राजकीय वर्तुळात सध्या अशी देखील चर्चा आहे की रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्चित होण्यासाठीच एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढणार असल्याचा डाव टाकल्याची आणि त्यानंतर रक्षा खडसे यांची भाजपमधून उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतून तब्येतीचे कारण देत माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. नुकतीच एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांची दिल्लीवारी चर्चेत आहे. या दिल्लीवारीच्या निमित्ताने एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.


5) भिवंडी लोकसभा 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरुवातीपासूनच भिवंडी लोकसभा मतदारसंघ लढणार असल्याचे जाहीर केला आहे. या ठिकाणाहून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आमचे उमेदवार असतील अशी देखील चर्चा सुरू ठेवली आहे. मात्र याच लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाला देखील दावा सांगितला असून, हा काँग्रेस लढवत असलेला मतदारसंघ असल्याने, तो मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी मागणी काँग्रेस पक्षाची आहे. मात्र अद्याप या लोकसभा मतदारसंघ संदर्भात निर्णय झालेला नाही.


ही बातमी वाचा: