मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने हट्टाने मुंबईतील सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघ स्वत:ला मागून घेतले आहेत. पण ठाकरे गटाची ताकद पूर्वीइतकी राहिलेली नाही. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने उभे केलेल्या पाचही उमेदवारांचा पराभव होईल, असे संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी म्हटले. मी हे भाकीत आत्ताच करुन ठेवत आहे. मुंबईतील एकाही मतदारसंघात ठाकरे गट जिंकू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे. 2022 पूर्वी असणारी शिवसेना आता राहिलेली नाही. ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. त्याचा कोणताही विचार न करता उबाठा गटाने (Uddhav Thackeray camp) मुंबईतील लोकसभेच्या पाच जागा मागून घेतल्या आहेत. मात्र, या सर्वठिकाणी ठाकरे गटाचा पराभव होईल, असे निरुपम यांनी म्हटले. ते मंगळवारी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संजय निरुपम यांनी मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे गटात लोकसभेच्या जागांचे समसमान वाटप न झाल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली. संजय राऊत यांनी प्रथम स्वत:चा शिवसेना पक्ष संपवला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आणि आता ते काँग्रेस पक्ष संपवण्याचे काम करत आहेत. संजय राऊतांच्या मुर्खपणाचा काँग्रेसमधील एकही नेता विरोध करत नाही. सध्याच्या घडीला प्रत्येक पक्षाकडे असणाऱ्या व्होटबँकेचा विचार करता काँग्रेस हा सगळ्या मोठा पक्ष आहे. कारण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पण लोकसभा जागावाटप करताना हा मुद्दा कोणीच ध्यानात घेतला नाही. मुंबईपुरतं बोलायचं झालं तर लोकसभेच्या जास्त जागांसाठी काँग्रेसच्या एकाही नेत्याने आग्रह केला नाही. लोकसभा जागावाटपाची सगळ्यात पहिली चर्चा झाली तेव्हा काँग्रेसने मुंबईतील तीन जागा मागितल्या होत्या. यामध्ये दक्षिण मध्य, उत्तर मध्य आणि वायव्य मुंबई मतदारसंघाचा समावेश होता. मात्र, आता आता चर्चेच्या 20 फेऱ्या पार पडल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला फक्त एकच जागा आली आहे. काँग्रेसच्या वाट्याला फक्त उत्तर मध्य मुंबईचा मतदारसंघ आला आहे. याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान येते. तरीही ही सीट ठाकरे गटाला नकोशी आहे. उद्धव ठाकरे यांना थेट भाजपशी सामना करायची भीती वाटते म्हणून ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे का, असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला.
काँग्रेसला ठाकरे गटापेक्षा जास्त जागा का मिळायला हव्या? संजय निरुपमांनी सांगितलं लॉजिक
मुंबई आणि राज्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हारलेल्या मनस्थितीत आहेत. त्यांच्यात जोश आणि उर्जा उरलेली नाही. तुम्ही व्होट बेसचा विचार कराल तर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ठाकरे गटाकडे नेमकी किती मतं आहेत, हे माहिती नाही. उबाठा गटाला नेमका किती लोकांचा पाठिंबा आहे, याचा अंदाज नाही. फक्त उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती आहे, अशी चर्चा आहे. कारण, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकही निवडणूक झालेली नाही. मी 2019 साली लोकसभेची निवडणूक लढलो होतो तेव्हा काँग्रेसला 3 लाख 10 हजार मतं पडली होती. आमची ही मतं शाबूत आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 70 हजार मतं पडली होती. त्यामध्ये भाजपच्या साडेतीन लाख मतांचा समावेश होता. उरलेली अडीच लाख मतं शिवसेनेची असली तरी आता त्यामध्ये फूट पडली आहे, याकडे संजय निरुपम यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संजय निरुपमांच्या या आरोपांना आणि टीकेला आता ठाकरे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा