Sambhaji Brigade Pravin Gaikwad: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावेळी प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्या अंगावर वंगणाचे तेल टाकण्यात आले. त्यांचा चेहरा काळ्या रंगाने माखवण्यात आला. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात याचे तीव्र पडसाद उमटले होते. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी फोन करुन प्रवीण गायकवाड यांची विचारपूस केली. याबाबत प्रवीण गायकवाड यांनी सोमवारी सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.

Continues below advertisement


या हल्ल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. सत्ताधाऱ्यांकडून फोन येणे अपेक्षित नव्हते. आदरणीय पवार साहेबांसोबत मी अनेक वर्षे जोडलो आहे.  नातू, मुलगा म्हणून त्यांनी माझी चौकशी केली. मला 'काळजी घे', असे सांगितले. याशिवाय सुप्रिया सुळे, रोहित पवार, रोहित पाटील, विश्वजित कदम, सतेज पाटील,पुरुषोत्तम खेडेकर, सदाभाऊ खोत, माधव जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही फोन करुन माझी विचारपूस केल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.


अक्कलकोट पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक हल्लेखोरांना अटक केली नाही. फक्त दीपक काटेला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात फोन करुन सांगण्यात आले आहे की, दीपक काटेला सुरक्षा द्या, त्रास देऊ नका. शिवधर्म फाऊंडेशनच्या हल्ल्यात माझ्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी दीपक काटे याच्यावर 307 चे कलम लावले पाहिजे होते. यावेळी झालेल्या झटापटीत आमच्या अनेक कायकर्त्यांच्या गळ्यातील चेन चोरी झाल्या. आमच्या गाड्यांचे नुकसान करण्यात आले. पोलिसांनी तसे गुन्हे दाखल केले पाहिजे होते. पण फक्त शाईफेकीचा गुन्हा आणि निषेध व्यक्त होणे, हा मोठा धोका आहे, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले.


भाजपची हिंसेवर श्रद्धा नाही,  हल्ल्याला आमचा पाठिंबा नाही: केशव उपाध्ये


प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, प्रवीण गायकवाड हल्ल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारावर आमची श्रध्दा नाही, आम्ही पाठिंबा देत नाही. या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल तरी पोलिस कायदेशीर कारवाई करतील. यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून प्रश्न उद्भवत नाही. कायदा आपलं काम चोख करेल, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले.



आणखी वाचा


प्रविण गायकवाडांचं थेट देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज, म्हणाले, 'सगळी जबाबदारी तुमची'