Rohit Pawar on Pravin Gaikwad attack: अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काळी शाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असताना, काही लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येऊन काळी शाई फेकली आणि त्यांना खाली ओढून मारहाण केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित 'शिवधर्म फाउंडेशन'च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दीपक काटे (Deepak Kate) (भाजप युवा मोर्चा – राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी दोन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी सध्या फरार आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे काळ्या रंगाचा शर्ट परिधान करत हातामध्ये पोस्टर घेत विधानभवन परिसरात दाखल झाले. या पोस्टरवर झुंडशाहीचा निषेध असा उल्लेख करण्यात आला होता. तर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केलाय.  

रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, पुरोगामी विचारासाठी लढणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. दिपक काटे नावाच्या भाजप कार्यकर्त्याने जे कृत्य केले त्याचा आम्ही निषेध करतो. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांनी जो समाजाला जो विचार दिला तो त्यांना पटला नाही म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. आता प्रवीण गायकवाड जो पुरोगामी विचार घेऊन जात आहेत तो त्यांना पटला नाही म्हणून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. 

प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती

या काटेकडे आधी पिस्तुल सापडलं.  त्याच्याकडे 28 काडतुसे सापडली. प्रवीण गायकवाड लढणारे आहेत, ते घाबरणारे नाहीत. ते बाजूला जाऊन थांबले. परंतु, काटे हा प्रवीण गायकवाड यांना पुन्हा घेऊन आला. काटे याच्याकडे बंदूक होती, अशी देखील माहिती मिळाली. कुठेतरी गायकवाड यांना मारण्याचा प्रयत्न होता. त्याने स्वतःच्या भावाला देखील सोडलं नाही, त्याला देखील मारलं आहे, असा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.

आणखी वाचा 

Pravin Gaikwad: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बामसेफ अन् संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट; प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक आरोप