Sambhaji Brigade Pravin Gaikwad: सोलापूरच्या अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाब विचारला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे (Deepak Kate) याला तुरुंगात चांगली सर्व्हिस मिळावी, यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. त्याला अजिबात त्रास देऊ नका, असे सांगितले जात आहे. कालच्या हल्ल्यानंतर दीपक काटे याच्यावर 307चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. पण त्याच्यावर फक्त शाईफेकीचा गुन्हा दाखल करुन त्याला सोडण्याचा कट आहे. हल्ल्यावेळी तिकडे तब्बल 50 जण होते. मात्र, फक्त दीपक काटे यालाच अटक करण्यात आली. या हल्ल्यामागे कोण आहे, याचा मास्टमाईंड कोण, हे शोधण्याचे काम सरकारचे आहे. आता या सगळ्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे, असे प्रविण गायकवाड यांनी म्हटले. ते सोमवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गेल्या काही काळातील सगळ्या घटना बघितल्या तर फक्त पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना संपवले जात आहे. हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या लोकांसोबत तसे घडताना दिसत नाही, ही बाब प्रविण गायकवाड यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाल्याची माहिती मला मिळाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि बामसेफला संपवण्याची योजना आखण्यात आली. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या विचारधारेचा तिसरा टप्पा सुरु केला आहे. त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पसरवणाऱ्या संघटना संपवण्याचा डाव आहे. जी समतेची तत्त्व आहे, तो विचार यांना संपवायचा आहे, असे प्रविण गायकवाड यांनी म्हटले.
यामधील दीपक काटे हा मोठा गुन्हेगार असून तरीही तो भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस कसा झाला? त्याला किरकोळ आरोपात घेऊन त्याला त्रास न देण्याच्या सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत, असा आरोपही प्रविण गायकवाड यांनी केला.
आणखी वाचा
संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांवर नेमका कसा हल्ला झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी