NCP Sharad Pawar Demand For Upcoming Assembly Elections: नागपूर : लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Elections 2024) मोठा विजय मिळवल्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) कंबर कसली आहे. आतापर्यंत विधानसभेच्या (Maharashtra Assembly Elections 2024) जागावाटपावरुन आमच्यात मतभेद नाहीत, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खटके उडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) नागपूरसह (Nagpur News) विदर्भात (Vidarbha News) आगामी विधानसभेसाठी वाढीव जागांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नागपूरसह विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी वाढीव जागांची मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फक्त काटोल आणि हिंगणा या दोन जागांवर निवडणूक लढवत होती. मात्र आता पवारांच्या पक्षानं काटोल, हिंगणा, उमरेड या ग्रामीण भागातील तीन जागांसह नागपूर शहरातील किमान दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. म्हणजे, थोरल्या पवारांच्या पक्षानं नागपूरसह विदर्भात एकूण पाच जागा मागतल्या आहेत. 


विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला वाढीव जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाला देण्यात यावी, अशी मागणीही पक्षानं केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा आणखी क्लिष्ट होण्याची चिन्ह आहेत. 


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकंदरीत काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असंच दिसत आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील 62 जागांपैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं फक्त 12 जागा लढवल्या होत्या. यंदा मात्र पक्षानं प्रत्येक जिल्ह्यात जागांची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.