मुंबई: राज्यातील आगामी विधानसभेची लढाई लढताना अजित पवार हे  नवाब मलिकांना सोबत घेऊन आखाड्यात उतरणार असल्याचे दिसत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी  आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्यावेळी गप्पा मारताना ही गोष्ट स्पष्ट केली. यापूर्वी विधान परिषदेसाठी रणनीती ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतही नवाब मलिक (Nawab Malik) उपस्थित होते. दरम्यान, अजित पवारांची ही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पटणार का? अशा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.


हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिकांबाबत भूमिका स्पष्ट केली होती. जोपर्यंत नवाब मलिकांना कोर्टाकडून क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत महायुतीत मलिकांना एन्ट्री देण्याबाबत फडणवीसांनी नकारघंटा वाजवली होती. त्यामुळे नवाब मलिक यांना जवळ केल्यास अजितदादा आणि भाजपाचं कसं जमणार, असा प्रश्न उपस्थित झालाय.


नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीलाही नवाब मलिक हजर होते. तेव्हाच नवाब मलिक यांचा राजकीय वनवास संपल्याची चर्चा सुरु झाली होती. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे अजितदादा गट नवाब मलिक यांच्यापासून अंतर राखून होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाची मतं निर्णायक ठरली होती. ही गोष्ट अजित पवार यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांशी संवाद साधून पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नवाब मलिक हे अल्पसंख्याक समाजाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यादृष्टीने अजित पवार आणि नवाब मलिक यांची स्नेहभोजनला एकाच पंगतीला बसण्याची कृती महत्त्वाची मानली जात आहे.


देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र विरोध


नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा खोटेपणा उघड केला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एगाण्याच्या अल्बमसाठी ड्रग्ज रॅकेटशी संबंध असणाऱ्या एका व्यक्तीचे पैसे गुंतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस या आरोपांवर संतप्त झाले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील कथित आरोपीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. या सगळ्यानंतर नवाब मलिक यांच्यापाठी तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला होता आणि त्यांना तुरुंगात जावे लागले होते. 


नवाब मलिक यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावली होती. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. तेव्हा नवाब मलिक अजितदादांच्या बाजूने म्हणजे सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले होते. त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना जाहीर पत्र लिहून नवाब मलिक यांचा सत्ताधारी गटात समावेश करण्यास तीव्र विरोध दर्शविला होता.


आणखी वाचा


देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?