मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. तर अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने शरद पवारांच्या पक्षाला फटका बसला. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुक आयोगाला (Election Commission) पत्र धाडण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.  


शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सातारा लोकसभेसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळे निवडणुकीत फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा मतदारसंघातील शशिकांत शिंदे यांचा 45 हजार मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात 37 हजार मते अपक्ष उमेदवाराच्या पिपाणीला पडली आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. तर अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना तब्बल  1 लाख 03 हजार 632 मतं मिळाली होती. बाबू भगरे यांचे चिन्ह पिपाणी होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. 


काय म्हटलंय पत्रात? 


लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला. तो विधानसभेला बसू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता म्हणून निवडणूक आयोगाला आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. फ्री सिम्बॉलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती करण्यात आली असून फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


जयंत पाटलांचा दावा


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यापूर्वी याबाबत दावा केला होता. जयंत पाटील यांनी म्हटले होते की,  ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि ‘पिपाणी’ या दोन्ही चिन्हांमध्ये थोडेफार साधर्म्य आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. अशातच या चिन्हांतील गोंधळामुळे ‘पिपाणी’ला राज्यात दीड लाख मते पडली होती. इतकेच नाहीतर सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे यामुळेच पराभूत झाले, असे त्यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा 


Dindori Lok Sabha: माझी विच्छा होती बुवा, राहिलो उभा! मळके कपडे, पांढरी टोपी, बिचकत-बिचकत बोलणाऱ्या 'सर' बाबू भगरेंना पडली 1,03,526 मतं