नाशिक: लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का देणारे जायंट किलर उदयाला आले आहेत. मात्र, या सगळ्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील (Dindori Lok Sabha) एका उमेदवाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. मात्र, याच मतदारसंघात बाबू सदू भगरे सर (Babu Bhagare) या उमेदवाराने तब्बल 1,03,526 मतं मिळवत सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. बाबू सदू भगरे यांची पार्श्वभूमीही तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. बाबू सदू भगरे हा कोणी धनाढ्य किंवा प्रचंड जरब असणारा व्यक्ती नाही. तर बाबू भगरे हे एकलहरेतील गंगावाडी परिसरात राहणाला साधा मजूर आहे. या साध्या मजुराला तब्बल लाखभर मतं कशी पडली, याबाबत सध्या अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दिंडोरीचे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने सर आहेत. तर बाबू भगरे यांच्या नावापुढेही 'सर' उपाधी लावण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचे चिन्हात देखील साधर्म्य असल्याचे दिसून आले. भास्कर भगरे यांचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस तर बाबू भगरे यांचे तुतारी असे चिन्ह होते.
मळके कपडे, पांढरी टोपी आणि बिचकत बिचकत बोलणारे 'सर' बाबू भगरे
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाखभर मते मिळवणाऱ्या बाबू भगरे यांची प्रचंड चर्चा रंगली होती. बराच काळानंतर ते सर्वांसमोर आले. यानंतर 'एबीपी माझा'ने बाबू भगरे यांना गाठून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मळके कपडे, पांढरी टोपी आणि बिचकत-बिचकत बोलणारे बाबू भगरे जगासमोर आले. बाबू भगरे यांना तुम्ही लोकसभा निवडणुकीला कसे उभे राहिलात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाबू भगरे यांनी अगदी म्हटले की, 'माझी विच्छा होती बुवा निवडणुकीला उभं राहायची, राहिलो उभा....' तुम्हाला एवढी मतं कशी पडली, हे विचारल्यावर बाबू भगरे यांनी त्याहून सहजसोप्या शब्दांत उत्तर दिले. मी एक शेतकरी आहे, शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे ना मला तिकडून. त्यांची मतं पडली, त्यांचं बी आपण करु ना, अशी च्छा होती, पण नाय पूर्ण मतं पडली तर काय करणार, अशी हतबलता निष्पापणे बाबू भगरे यांनी व्यक्त केली.
तिसरी पास बाबू भगरे यांना निवडणुकीला उभं राहायला कोणी सांगितलं?
बाबू भगरे यांनी निवडणुकीला उभे राहण्यामागील कारण सांगताना म्हटले की, मी निवडणुकीला उभा राहिलो कारण जागा होती ना, आदिवासी जागा होती ना, फॉर्म भरायचा काय होईल ते होईल, असा विचार मी केला. पडलो तर पडलो, आलो तर आलो, विच्छा होती भरला मी फॉर्म. मला कोणी काही सांगितलं नाही, बोललं नाही, मी माझ्या मताने फॉर्म भरला, असे बाबू भगरे यांनी सांगितले.
सर बाबू भगरेंनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा केला?
बाबू भगरे यांना तुम्ही लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा केला, याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी भगरे यांनी सांगितले की, मी लोकांना प्रचारावेळी सांगितलं तुमची काम असली तर करु. याशिवाय, कांद्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन लोकांना दिले. पण आता मी पडलो तर काय करणार? मी प्रचारासाठी कोणालाही फोनबीन केला नाही, केले तर गाववाल्यांनी केले असतील. नातेवाईकांनाही मी मतदान करण्याचे आवाहन केले होते. दिंडोरीत 15-20 हजार लोक ओळखीचे होते, त्यांच्याकडे आणि नात्यागोत्याच्या लोकांकडे प्रचार केल्याचे बाबू भगरे यांनी सांगितले.
मजुरी करणाऱ्या बाबू भगरेंच्या नावापुढे सर उपाधी कशी लागली?
बाबू भगरे यांच्या नावापुढे सर अशी उपाधी असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावरुन तुम्हाला लोक 'सर' का म्हणतात, असा प्रश्न बाबू भगरे यांना विचारण्यात आला. शाळेत असताना जोडीदार, पोरबिरं मला 'सर' म्हणून हाक मारायची. त्यामुळे मला 'सर' असे 'टोकननाव' पडलं. नाहीतर बाबू भगरे हेच नाव दाखल्यावर आहे, असे स्पष्टीकरण भगरे यांनी दिले.
सर नावामुळे मला जास्त मतं पडल्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीही होऊ शकतं ना, त्यामुळे सर नावामुळे मला मतं पडली असतील, असे भगरे यांनी म्हटले. यावेळी बाबू भगरे यांना ते दिवसभर काय काम करतात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाबू भगरे यांनी म्हटले की, मी दिवसभर शेतात मजुरी करतो, दुसरं काही नाही. माझ्याकडे दोन गायी आहे. बाकी मासे मारायचे, काही आलं आंबे-बिंबे उतरवायचे एवढंच काम मी करतो, असे बाबू भगरे यांनी सांगितले.
आणखी वाचा
कांद्यानं केला करेक्ट कार्यक्रम! शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवलं आस्मान, निर्यातबंदीचा महायुतीला फटका