Jayant Patil on Legislative Council Election : हॉटेलमध्ये ठेवून आमदारांवर (MLA) अविश्वास दाखवणं अयोग्य आहे. आमचे आमदार तावूनसलाखून निघाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. हॉटेल महाग झाली आहेत, तरी देखील आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे. पैशांची कशी उधळपट्टी होते हे लोक पाहत असल्याचे पाटील म्हणाले.
समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाला त्याचे पैसे कुठे कुठे गेले?
समृद्धी महामार्ग ही मोठी कहाणी आहे. समृद्धी करणाऱ्यांनी नेमकं काय काय केलं याबद्दल रोहित पवार यांनी सभागृहात मांडल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रची समृद्धी होण्याऐवजी त्यावेळी निर्णय कोण घेत होता त्यांची समृद्धी झाल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे पैसे कुठे कुठे गेले? याची मोठी लिस्ट असल्याचे जयंत पाटील म्हणाले. एम 40 ग्रेडचा सिमेंट समृद्धीसाठी वापरला म्हणतात, तर मग भेगा कशा पडतात? समृद्धीला भेगा, अटल सेतूला भेगा, आम्ही काही बोललो तर म्हणतात की प्रकल्पला तुम्ही बदनाम करताय असे जयंत पाटील म्हणाले. सत्य तुम्ही का स्वीकारत नाही. जर भेगा पडत असतील तर त्या का पडताय? हे विषय आम्ही सभागृहात मांडणार होतो. पण आम्हाला बोलू दिलं पाहिजे. हे बोलू देत नाहीत आणि सत्ताधारी पळ काढताना पाहायला मिळत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आज पक्षप्रवेश
माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आमच्या पक्षात प्रवेश होत आहे. त्यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज प्रवेश करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते आता पुढं काम करतील असं पाटील म्हणाले.
कोणत्या हॉटेलमध्ये कोणत्या पक्षाचे आमदार?
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. भाजपने आपल्या आमदारांची सारी व्यवस्था ही कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये केली आहे. या प्रेसिडेंट हॉटेलमधील एका खोलीचे किमान भाडे हे 15 हजार रुपये आहे. शिवसेना शिंदे गटाने आपल्या आमदारांची व्यवस्था वांद्रे येथील 'ताज लॅण्डस एंड' या हॉटेलात ठेवली आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये 15 ते 25 हजारांच्या दरम्यान भाडे आहे. या हॉटेलमध्ये शुक्रवार व शनिवारचे दर ते 30 हजारांपेक्षा अधिक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना परळच्या 'आयटीसी ग्रॅण्ड'मध्ये ठेवण्यात येणार असून तेथील भाडे हे 12 ते 15 हजारांच्या दरम्यान आहे.
महत्वाच्या बातम्या: