मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच आता अजित पवार यांच्याकडून शरद पवार गटावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाची (Sharad Pawar Camp) कोंडी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजितदादांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) त्यांचे खाते असलेल्या बँकेला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये आपल्या परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली होती तेव्हा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे. तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याबाबत घडू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) बँकेला पत्र पाठवून शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करुन देऊ नयेत, यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचे समजते.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय असलेले बॅलर्ड पिअर येथील कार्यालयही अजित पवार गटाकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बँक खाते आणि बॅलर्ड पिअर येथील मुख्यालय अजित पवार गटाला मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली घडल्या नव्हत्या. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी बॅलर्ड पिअर येथील राष्ट्रवादीचे कार्यालय आपल्या ताब्यात घेतले जाऊ शकते. तसे झाल्यास शरद पवार गट आक्रमक होऊ शकतो. परिणामी अजित पवार गट आणि शरद पवार गटात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बारामतीवरुन दोन्ही गट आमनेसामने
अजित पवार गट आणि शरद पवार गटात अधुनमधून कायदेशीर आणि इतर लुटूपुटीच्या लढाया सुरु असतात. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरु असतात. परंतु, या दोघांमधील खरी लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात रंगणार आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये प्रचंड संघर्ष होताना दिसेल.
आणखी वाचा
येणाऱ्या काळात अजित पवार एकटेच पडतील, भाजप पक्ष संपवेल - रोहित पवार