बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी  पोलिसांनी नुकतीच एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीचे नाव किंचक नवले असे असल्याची माहिती समोर आली आहे. किंचक नवलेने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी किंचक नवलेचा शोध सुरु केला होता. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर किंचक नवले फरार झाला होता. तो वेषांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर सांताक्रुझ पोलिसांनी सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने साताऱ्यातील सदर बाझार येथून ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने किंचक नवलेला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


कोण आहे किंचक नवले?


किंचक नवले हा गेवराईतील भडंगवाडी गावचा रहिवासी आहे. किंचक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करत आहे. त्याला दोन भाऊ आहेत. किंचक नवले विवाहित आहे. त्याची आई अरुणाबाई राधाकृष्ण नवले या सरपंच आहेत. किंचकला सरकारी अधिकारी व्हायचे असल्याने तो सध्या एमपीएससी परीक्षेसाठी तयारी करत होता. त्याचे प्राथमिक शिक्षण गेवराई येथे झाले. तर पुढील शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. 


किंचकचे दोन भाऊ आहेत. या सगळ्यांची मिळून एकूण 15 एकर शेती आहे. परंतु, हा परिसर दुष्काळजन्य असल्यामुळे शेतीमधून नवले कुटुंबीयांना फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळेच किंचक एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. किंचक हा पूर्वी अजितदादा गटातील अमरसिंह पंडित यांचा समर्थक होता. मराठा आरक्षण चळवळ सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे यांच्या समर्थनात किंचक आंदोलनात उतरला होता. जरांगेंच्या जिथे सभा होतील त्याठिकाणी किंचक जायचा. जरांगे पाटील सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले होते त्याच त्यादिवशी किंचक हा सराटी येथे होता. जरांगे पाटील भावूक झालेले पाहिल्यानंतर किंचक याने एका पोर्टलसाठी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर किंचक याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.


किंचक फडणवीसांचं राजकीय अस्तित्त्व संपवू, असं म्हणाला होता; भावाचा दावा


माझ्या भावाने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्याने देवेंद्र फडणवीसांबाबत जी संपवण्याची भाषा केली. त्याचा अर्थ फडणवीसांचे राजकीय अस्तित्त्व संपवू, असा होता. त्याचा तो शाब्दिक रोष होता. मनोज जरांगे पाटील भावूक झाल्यामुळे तो तसं बोलला. दोन टक्के समाजाचे राजकीय अस्तित्त्व मिटवून टाकू, असे त्याचे म्हणणे होते, असे ज्ञानेश्वर नवले यांनी म्हटले.  किंचकने काही गुन्हाच केला नाही. समाजाची भावना राज्य सरकार पर्यंत पोहचावी, यासाठी त्याने हे वक्तव्य केले आहे. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ज्ञानेश्वर नवले यांनी म्हटले.


आणखी वाचा


महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव, मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप