बीड - मराठावाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या बजरंग सोनवणेंनी यंदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर, त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली. बजरंग सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कुठलंही शक्तीप्रदर्शन न करता भरला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी येणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरला उशीर झाल्यामुळे, सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. सोनवणे यांनी गत लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडेंविरुद्ध 5 लाखांपेक्षा अधिक मत घेतली होती. यंदा त्यांना पंकजा मुंडेंचं आव्हान आहे. मतदारसंघात वजन दाखवलेल्या बजरंग सोनवणे हे संपत्तीतही तगडे उमेदवार आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या संपत्तीमध्ये मागच्या पाच वर्षात 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोनवणे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडूनच लोकसभा निवडणूक लढवली होती. पाच वर्षांपूर्वी त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जानुसार संपत्तीमध्ये 17 कोटी 52 लाख 77 हजार 568 रुपयांनी वाढ झाली आहे.बजरंग सोनवणे यांनी काल साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील हे उपस्थित राहणार होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना पोहोचायला उशीर झाला. म्हणून, जयंत पाटील बीडला पोहोचण्याआधीच बजरंग सोनवणे यांनी महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांसोबत आपला उमेदवारी अर्ज भरला.
येडेश्वरी शुगर्सचे चेअरमन असलेल्या साखर कारखानदार बजरंग सोनवणेंची संपत्ती कोट्यवधींची आहे. त्यातच, बीडमध्ये यंदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण तापलं असल्याने सोनवणेंना मराठा उमेदवार असल्याने फायदा होऊ शकतो, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. त्यातच, आता त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातून त्यांची एकूण संपत्ती समोर आली असून ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत.
अशी आहे बजरंग सोनवणे यांचे संपत्ती
बजरंग सोनवणे यांच्याकडे तीन कोटी 59 लाख 16 हजार 530 रुपयाची चलसंपत्ती आहे. तर पत्नी सारिका यांच्याकडे दोन कोटी 87 लाख 24 हजार रुपयांची संपत्ती आहे. सोनवणे यांच्या नावे तीन ट्रॅक्टर, एक टँकर एक हार्वेस्टर आहे. तर पत्नी सारिका सोनवणे यांच्या नावे दोन ट्रॅक्टर एक हार्वेस्टर आणि एक कार आहे. एकत्रित सोनवणे कुटुंबाकडे तीन ट्रॅक्टर आहेत. दोन लाख 19 हजार रुपयांचं सोनं बजरंग सोनवणे यांच्याकडे आहे. सोनवणे यांच्यावर सहा कोटी 93 लाख 18 हजार 112 रुपयांचे कर्ज आहे. तर, पत्नी सारिका यांच्यावर 72 लाख 82 हजार 969 रुपयांचे कर्ज आहे. एकत्रित सोनवणे कुटुंबाच्या नावावर नऊ लाख 14 हजार रुपयांचे कर्ज आहे..
वाढली संपत्ती 63 टक्के संपत्ती
सोनवणे कुटुंबाकडे सहा कोटी 45 लाख 14 हजार रुपयांची संपत्ती होती. यामध्ये तीन कोटी 87 लाख 96 हजार 68 रुपयांची वाढ होऊन ते दहा कोटी 63 लाख 10 हजार 459 इतकी झाली आहे. तर 2019 मध्ये 4 कोटी 64 लाख 86 हजार पाचशे रुपयांची अचल संपत्ती होती या 13 कोटी 64 लाख 81 हजार पाचशे रुपयांची वाढ होऊन ती आता 18 कोटी 29 लाख 68 हजार इतकी झाली आहे.