Navneet Rana: अमरावती - विदर्भातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या अमरावती (Amravati) मतदारसंघात राणा दाम्पत्याने प्रचारात आघाडी घेतली आहे. स्थानिक नेत्यांच्या विरोधानंतरही भाजपने नवनीत राणांना (Navneet Rana) उमेदवारी दिली. त्यानंतर, काहीशा मवाळ झालेल्या राणा दाम्पत्याने प्रचारात आक्रमकता आणली आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य करताना, राणा दाम्पत्याने तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. अमरावती शहरात उमेश कोल्हे हत्याकांडने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आता, दुसरं उमेश कोल्हे हत्याकांड अमरावतीत होणार नाही, असं वचन विद्यमान नवनीत राणा यांनी आज जाहीर सभेत अमरावतीकरांना दिलं. यावेळी, उमेश कोल्हे यांच्या पत्नीही व्यासपीठावर उपस्थित होत्या. तर, संजय राऊतांवरही (Sanjay Raut) निशाणा साधला.


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केला होता. अमरावती प्रचार दौऱ्यात त्यांनी नवनीत राणांवर बोचरी टीका केली होती. त्यावरुन, राणा दाम्पत्याने संजय राऊतांवर पलटवार केला. तर, उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमरावती शहरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील मैदानात झालेल्या सभेत नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि उमेश कोल्हे यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यानिमित्ताने हत्याकांडाच्या घटनेनंतर प्रथमच उमेश कोल्हे यांच्या पत्नी समोर आल्या. यावेळी, त्यांनी राणा दाम्पत्यांचे आभार मानत नवनीत राणा यांना अमरावतीकरांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले.


नवनीत राणा यांनी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कोण संजय राऊत, असे म्हणत आपण त्यांना महत्त्व देत नसल्याचं राणा यांनी म्हटलं. माझ्यावर बोलण्याआधी माझ्या वडिलांनी देशासाठी सेवा केली आणि मी अमरावतीत सेवा दिली, अशी आठवण करुन दिली. तसेच, संजय राऊत तुम्ही माझ्यावर बोलण्याआधी तुमच्या मुलीकडे, आई कडे पाहायचं असतं, असे नवनीत राणांनी म्हटले.


काय आहे उमेश कोल्हे हत्याकांड


पशुवैद्यकीय औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे ‘मेडिकल स्टोर’ बंद करून घरी जात असताना त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा संकेत याने पोलिसात फिर्याद दिली. तर राणा दाम्पत्याने हे प्रकरण उचलून धरल्याने, या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. सध्या, एनआयएमार्फत खटला सुरू आहे. 


नवनीत राणा हिंदू शेरणी


आमदार रवि राणांनी आपल्या भाषणात उमेश कोल्हेंच्या हत्याप्रकरणावर भाष्य केलं. उमेश कोल्हे यांच्या पत्नी आज मंचावर आहेत. हिंदू विचाराचे उमेश कोल्हे यांनी हिंदू विचारांची पोष्ट केली म्हणून त्यांची हत्या झाली. मात्र, यशोमती ठाकूर यांनी या घटनेला रॉबरीचं रूप दिलं होतं. खसदार नवनीत राणा आणि मी याबाबत आवाज उचलला. तेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ANI ची टीम अमरावतीमध्ये पाठवली, तेव्हा सत्य पुढे आल्याचे आमदार रवि राणा यांनी भाषणात सांगितले. तसेच, शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. तेव्हाच्या उद्धव ठाकरे सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.हिंदूंची हत्या करायची आणि मत मागायचं. मात्र, देशाला पंतप्रधान मोदी लाभले आहेत, हिंदू शेरणी म्हणून आता नवनीत राणा पुढे आल्या आहेत, असेही राणांनी म्हटले.