सोलापूर - देशातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाला (Voting)आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. त्यामुळे, देशभरात निवडणुकीचा फिव्हर असून उत्साहही सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यातच, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आज अंतिम मुदत असल्याने गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर, आज सर्वच इच्छुक उमेदवारही अर्ज भरुन आपली उमेदवारी निश्तिच करणार आहेत. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर नामनिर्देशन पत्रासोबत आपल्या संपत्तीचे विवरणपत्रही जोडले आहे. त्यामुळे, आपला उमेदवार किती श्रीमंत आहे, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्ती, मालमत्ता, जमीन जुमला याची माहिती सार्वजनिक झाली आहे. सोलापूरमधील (Solapur) काँग्रेस उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे (प्रणिती शिंदे) यांनीही गुरुवारी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, त्यांचीही एकूण संपत्ती जनतेसमोर आली आहे. 


आमदार प्रणिती शिंदे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या 6 कोटी 60 लाख 70 हजार 402 रुपयांची मालमत्ता आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत 1 कोटी 81 लाख 42 हजार 192 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत  आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे 2019 मध्ये चार कोटी 79 लाख 27 हजार 210 रुपयांची मालमत्ता होती.तर, 2024 मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी 60 लाख 70 हजार 402 रुपयांची मालमत्ता, संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी,चारचाकी नसल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले आहे. 2019 च्या तुलनेत त्यांची बँकांमधील ठेवी तथा रक्कम जवळपास 30 लाख रुपयांनी कमी झाली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे दिसून येते.


बँक अन् पोस्टातील गुंतवणूक


प्रणिती यांच्याकडे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने असून त्यांच्या नावे 5 एकर 70 गुंठे जमीन आहे. त्यांची शेअर्समधील गुंतवणूक जवळपास 12 लाख रूपये एवढी आहे. बँका आणि पोस्ट खात्यातील ठेवींची एकूण रक्कम 99.51 लाख रुपये असून आमदार प्रणिती शिंदेंच्या नावावर एकही वाहन नाही. तर, एक रुपयांचे कर्जही त्यांनी घेतलेले नाही. दरम्यान, मुंबईतील दादर आणि सोलापूर येथे त्यांच्या नावावर एक-एक घर आहे. त्यामुळे, माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या असलेल्या प्रणिती शिंदेंची संपत्ती कोट्यवधी रुपयांची असल्याचे निष्पन्न झालं आहे. 


राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे


सोलापुरात आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना होत आहे. त्यामुळे, ही लढाई माजी मुख्यमंत्र्यांची कन्या विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी असल्याचा प्रचार आमदार राम सातपुते यांनी केला होता. त्यावर, काँग्रेस समर्थकांनीही त्यांच्या गत 5 वर्षात झालेल्या संपत्तीमधील वाढीचा दाखल देत, प्रत्युत्तर दिले. मात्र, राम सातपुते यांच्यापेक्षा प्रणिती शिंदेंची संपत्ती अधिक आहे. 


संबंधित बातम्या


 Lok Sabha Election : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती?