नाशिक: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्यानिमित्ताने दररोज नवीन रंजक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी येत्या 26 जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. यापैकी नाशिक शिक्षक मतदारसंघातून (Nashik Teacher constituency) राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचा मार्ग काहीसा सुकर झाला होता. परंतु, त्यानंतर काहीवेळातच राजेंद्र विखे-पाटील (Rajendra Vikhe Patil) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राजेंद्र विखे-पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक शायरी लिहली आहे. ही शायरी अत्यंत सूचक मानली जात आहे. "शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोका खा गया; वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था!", असे या शायरीत म्हटले आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीबाबत राजेंद्र विखे- पाटील यांना अनपेक्षित असे काही घडले का? त्यांना ऐनवेळी माघार घ्यायला लागल्याने ते नाराज आहेत का? त्यांच्या या नाराजीचा रोख कोणाच्या दिशेने आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नाशिक शिक्षक मतदारसंघात नेमकं काय घडलं?
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू आहेत राजेंद्र विखे पाटील यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापूर्वी त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतूनही माघार घ्यावी लागली होती. काल शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी अर्ज माघारी घेण्यासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील आणि राजेंद्र विखे याच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. यानंतर राजेंद्र विखे यांनी शेवटच्या क्षणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रतिनिधी पाठवून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. यापूर्वी त्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय सांगितले, याचा तपशील मात्र उपलब्ध झालेला नाही. परंतु, उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर काहीवेळातच राजेंद्र विखे यांनी अचानक फेसबुकवर ही पोस्ट शेअर करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील काही बोलणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
नाशिक शिक्षक मतदारसंघात तिहेरी लढत
नाशिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे उमेदवार असतील. तर त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे उमेदवार असतील. याठिकाणी महायुतीच्या दोन उमेदवारांमध्येच लढत पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा