Eknath Shinde on Hemant Godse : "मी आपल्याला एवढच सांगतो की, तुम्ही खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठिशी उभे राहा. कोणताही अन्याय होणार नाही. तुम्ही काळजी करु नका. 7 ते 8 मतदारसंघ आहेत. त्यावर चर्चा सुरु आहे. आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. तुमच्या भावना, तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे. महायुतीमध्ये आपण जास्तीत जास्त जागा जिंकून देऊ. जास्त जागा आल्या तर आपल्याला आपल्या कामाची पोहोचपावती मिळेल",असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जागेवरुन पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी. यासाठी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर शक्तीप्रदर्शन केले आहे. यानंतर एकनाथ शिंदे बोलत होते. 


अजूनही जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे


एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये आज आगळ वेगळं वातावरण आहे. अजूनही जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात देशात मोठी विकासकामे झाली आहेत. यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवाय महायुतीलाही पाठिंबा देत आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे लोक आमच्या पाठिशी आहेत, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. 






एक-एक जागा आपल्याला महत्वाची आहे


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नाशिक आपला बालेकिल्ला आहे. मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचे सरकार आणायचे आहे. आपण 45 पार म्हणतो. त्यामुळे एक-एक जागा आपल्याला महत्वाची आहे. प्रत्येक खासदार आपल्यासाठी महत्वाचा आहे. काही जागांवर बारीक चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यामध्ये लक्ष देत आहेत. मात्र, नाशिकची जागा आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे. आपला आग्रह मी त्यांना सांगितलेला आहे. कोणत्याही बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेऊ नका, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. 


नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच


नाशिकच्या जागबाबत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळेच आज गोडसे यांनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केले आहे. यावेळी शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनीही हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. 


इतर महत्वाच्या बातम्या


BJP Candidate List : भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी; राम सातपुते, सुनील मेंढे आणि अशोक नेते यांना उमेदवारी