मुंबई : भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भंडारा-गोंदियात  खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गडचिरोली मधून खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. तसेच सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तरुण आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता सोलापुरात आमदार विरुद्ध आमदार अशी लढत होणार आहे. 


महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावे जाहीर


सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कापण्यात आले आहे. सोलापूरमधून आता राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राम सातपुते यांनी सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. 


भाजपकडून दोन विद्यमान खासदारांना संधी


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातूनही पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देण्यात आली आहे. सुनील मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते गेले पाच वर्षे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर अशोक नेते यांची ही लोकसभा निवडणुकीची तिसरी वेळ आहे. अशोक नेते गेले दहा वर्ष गडचिरोलीचे खासदार आहेत.




 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मोठी बातमी : कंगना राणौत, अरुण गोविल यांना लोकसभेचं तिकीट, भाजपकडून 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर