Narendra Modi on Congress : “दहशतवादी 2014 च्या पूर्वी वाटेल तेव्हा आणि वाटेल तिथे हल्ला करु शकत होते. 2014 च्या पूर्वी निर्दोष लोक मारले जात होते. भारतातील कानाकोपऱ्याला टार्गेट केले जात होते. तेव्हाचे सरकार गपचूप बसायचे. तोंड सुद्धा उघडत नव्हते. 2014 नंतरचा भारत घरात घुसून मारतो. आताचा भारत सर्जिकल स्ट्राईक करतो, एअर स्ट्राईक करतो. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचे सामर्थ्यही भारताने दाखवले आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. ते लोकसभेत बोलत होते. नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
संविधान डोक्यावर ठेऊन नाचणारे लोक जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करण्याचे धैर्य दाखवत नव्हते
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता देशातील प्रत्येक नागरिक जाणतो की, आपल्या सुरक्षेसाठी भारत काहीही करु शकतो. आर्टिकल 370 व्होट बँकेचे शस्त्र बनवण्यात आले. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमधील लोकांचे अधिकार गेले होते. भारताचे संविधान जम्मू-काश्मीरच्या सीमेमध्ये प्रवेश करु शकत नव्हते. हे संविधान डोक्यावर ठेऊन नाचणारे लोक जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करण्याचे धैर्य दाखवत नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत होते. कलम 370 चा काळ होता,तेव्हा सीमेवर दगड मारण्यात येत होते. हे लोक निराशेत जात म्हणायचे आता जम्मू -काश्मीरचे आता काहीही होऊ शकणार नाही. आता आर्टिकल 370 ची भिंत कोसळली आहे.
आम्ही तुष्टीकरण नाही,तर संतुष्टीकरण करतो, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, लोकशाही मजबूत आहे. भारताच्या संविधानावर विश्वास टाकत आणि भारताच्या तिरंग्यावर विश्वास टाकत लोकांनी मतदान केले. 140 कोटी देशवासियांमध्ये विश्वास निर्माण झाला. आम्ही तुष्टीकरण नाही,तर संतुष्टीकरण करतो. आम्ही खरी धर्मनिरपेक्षता देशाला दाखवली आहे. आमच्या निष्ठेवर देशातील जनतेने विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत आम्ही जनतेमध्ये मोठा संकल्प घेऊन गेलो, आशीर्वाद मागण्यासाठी गेलो होतो. विकसित भारतासाठी आम्ही आशीर्वाद मागितला होता. जनतेने विकसित भारताच्या संकल्पाला पाठिंबा देत विजयी केले. आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या