नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. 


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. 


आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले. 


 






भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स, सरकार कटिबद्ध 


आमच्या सरकारचे भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण असल्याने देशातील जनतेने आमच्या सरकारला आशीर्वाद दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. नेशन फर्स्ट हे आमचे एकमेव ध्येय आहे असं ते म्हणाले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काल आणि आज अनेक खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले मत व्यक्त केले आहे, विशेषत: जे पहिल्यांदाच खासदार म्हणून आले आहेत. त्यांनी संसदेच्या सर्व नियमांचे पालन केले आणि त्यांचे वर्तन कौतुकास्पद होते. पहिल्यांदाच खासदार असूनही त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे आणि त्यांच्या मतांनी चर्चेला अधिक मौल्यवान बनवले आहे."


नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 


भारतातील जनता किती प्रगल्भ आहे, भारतातील जनता किती विवेकी आहे हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज तिसऱ्यांदा आपल्याला देशवासीयांनी संधी दिली. 


या देशाने तुष्टीकरणाचे राजकारणही दीर्घकाळ पाहिले आहे. तुष्टीकरणाचे शासनाचे मॉडेलही देशाने दीर्घकाळ पाहिले आहे. पण आम्ही तुष्टीकरणाचा नाही तर समाधानाच्या पर्यायाचा विचार करत आहोत. जेव्हा आपण समाधानाबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ प्रत्येक योजनेचा लाभ हा शेवटपर्यंत पोहोचवणे असा होतो. जेव्हा आपण संपृक्ततेचे तत्त्व पाळतो, तेव्हा संपृक्तता म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय, संपृक्तता म्हणजे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता होय. त्या जोरावर देशातील जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन निवडून दिलं आहे.


मी आज तुमच्या माध्यमातून देशवासियांना आश्वासन देतो की, विकसित भारताचा जो संकल्प घेऊन आम्ही निघालो आहोत, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही भरभरून प्रयत्न करू, पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि आपल्या शरीराचे प्रत्येक कण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित करू


ही बातमी वाचा: