Narendra Modi and BJP : "जर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुढील एक वर्षासाठी पंतप्रधान राहतील. मोदींनी स्वत: हा नियम बनवला आहे की, पक्षात वयाच्या पंच्चाहत्तरीनंतर कोणताही नेता सक्रिय राहू शकत नाही", असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला होता. दरम्यान, केजरीवाल यांच्या दाव्याबाबत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाष्य केलं आहे. 


काय म्हणाले अमित शाह ?


वयाच्या 75 वर्षांनंतर पक्षाचा कोणताही नेता पंतप्रधान होऊ शकत नाही, असं भाजपच्या घटनेत म्हटलेले नाही. निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भाजपकडून पंतप्रधान होणार आहेत, अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. केजरीवाल म्हणाले होते की, 75 वर्षांनंतर त्यांच्या पक्षातील कोणीही सक्रिय राजकारणात राहू शकत नाही, असा नियम पंतप्रधान मोदींनी स्वतः बनवला आहे. यावेळी भाजपने निवडणूक जिंकली तर पुढील वर्षी पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे होतील आणि त्यानंतर अमित शहा यांना पंतप्रधान बनवतील. मात्र, अमित शाह यांनी केजरीवाल यांचा दावा फेटाळून लावला आहे. 


केजरीवाल यांना न्यायालयाकडून केवळ अंतरिम जामीन मिळालाय


पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, मी अरविंद केजरीवाल आणि इंडिया आघाडीला सांगू इच्छितो की, भाजपच्या घटनेत असे काहीही (75 वर्षांनंतर निवृत्ती) नमूद केलेले नाही. पीएम मोदी केवळ हा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत तर पंतप्रधान मोदी देशाचे नेतृत्व करणार आहेत. देशात याबाबत कोणताही संभ्रम नाहीये. केजरीवाल यांना न्यायालयाकडून केवळ अंतरिम जामीन मिळालाय, तो तात्पुरता आहे. न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दारू धोरण प्रकरणातून कायमचं मुक्त केलं असं काही  नाही. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अजूनही तुरुंगात आहेत.


अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. मला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे, मला जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती.  मात्र, सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांची मागणी मान्य केली नाही. केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळालाय. त्यामुळे त्यांना  2 जून रोजी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जाऊ शकतं. अरविंद केजरीवाल यांनी ही क्लीन चिट मानली तर त्यांची कायद्याची समज कमकुवत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maval Loksabha : ठाकरेंचा प्रचाराचा धडाका, महायुतीकडे आमदारांची ताकद, नात्यागोत्याचं राजकारण, श्रीरंग बारणेंसमोर तिसऱ्यांदा निवडून येण्याचे आव्हान