नंदुरबार : बदलापूरमधील एका शाळेत (Badlapur School Case) 13 ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गंभीर आरोप केला आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे. 


आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र हा गुजरात धार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे. बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले. मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे.  


सरकार या विषयाचे राजकारण करतंय 


ते पुढे म्हणाले की, पोलीस कारवाई करत नाही, आरोपी पकडत नाही म्हणून जनआंदोलन निर्माण झाले. हा राजकारणाचा विषय नाही. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे. 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. राज्यात 2014 ते 2024 या दहा वर्षात सुमारे 22 हजार अत्याचाराच्या घटना घडल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे, 


महाराष्ट्रातील सरकार असंविधानिक


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंविधानिक आहे. सरकारमधले तिघे तिजोरी पोकरत आहेत. साक्रीमधल्या कार्यक्रमासाठी आदिवासी बांधवाच घर पाडण्यात आले, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे. 


24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद 


दरम्यान, महाविकास आघाडीकडून येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. तरी जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.


आणखी वाचा 


Badlapur School case in HC: लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का? बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने सरकारला झाडलं, पोलिसांनाही झाप झाप झापलं