CM Eknath Shinde on Badlapur Case : बदलापूर : बदलापूरच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हळहळला. याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटल्याचे पाहायला मिळाले. बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं जातंय, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं केला जातोय. तर विरोधकांनी या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता याच प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. तीन चार महिन्यांपूर्वी बदलापूर सारखीच एक घटना घडलेली, त्यावेळी फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण गेलं, त्यानंतर दोन महिन्यांत आरोपीला फाशी देण्यात आली, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. पण हे प्रकरण नेमकं कोणतं? अशी विचारणा आता मुख्यमंत्र्यांना होत आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी रत्नागिरीत (Ratnagiri) झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) वचनपूर्ती सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "बदलापूर घटनेचं राजकारण केलं जात आहे. तीन चार महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली. त्यावेळी प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं गेलं. आणि दोन महिन्यांत या आरोपीला फाशीची शिक्षा झाली..."


संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेते किरण माने यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तुम्ही पाहिलं असेल काल मुख्यमंत्र्यांची बदलापूरच्या घटनेनंतर एक क्लिप व्हायरल झाली. मुख्यमंत्री असं सांगत आहे की, महाराष्ट्रात अशीच घटना घडली. पण, आम्ही ती फास्टट्रॅकवर चालवली आणि आरोपीला दोन महिन्यापूर्वी फाशी दिली. माझा असा प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा घटना चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले? कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली? यातला तपशील जाहीर करणे गरजेचे आहे.


किरण माने नमकं काय म्हणाले?


किरण माने यांनी बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की,  मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, "चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली." इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस' म्हणवुन घ्यायच्या लायकीचा नाही..." 


पाहा व्हिडीओ : Eknath Shinde : Badlapur घटनेचं राजकारण, आधीच्या एका घटनेत 2 महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा



महत्त्वाच्या इतर बातम्या :